सुरगड ते सरसगड – मधली वाट अनगड

चक्रमच्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या सर्क्यूलरसाठी ट्रेक कोणता करायचा याचा विचार करताना राजश्री कामथने सुरगड ते सरसगड ट्रेक करण्याची कल्पना सुचवली. असा ट्रेक हल्ली फारसा कुणी करत नाही हे त्याचे मुख्य आकर्षण होते. एक नवीन डोंगरवाट वाट करायला मिळणार होती. त्यामुळे मी लगेच तयार झालो. राजश्री नेता, मी आणि नचिकेत घटे उपनेते अशी टीम ठरली.

सुरगड आणि सरसगड तसे माझे दोन -दोनदा बघून झाले होते. मी पहिल्यांदा सुरगडावर गेलो होतो ते जवळपास ३०-३२ वर्षांपूर्वीच्या एका पावसाळ्यात. त्यावेळच्या चक्रमच्या तरुण पिढीचा आदर्श असलेला विनय नाफडे उर्फ लांबा त्या ट्रेकला आला होता. एक दिवसाच्या ट्रेकला सुद्धा तो त्याची भलीमोठी jaguar सॅक घेऊन आला होता. त्या सॅक मध्ये जेवढं सामान असायचं तेवढं तर एखाद्या किराणा दुकानात सुद्धा नसेल. ती सॅक एकदा पाठीला लावून कसं वाटतंय ते तर बघू म्हणून सुरगड उतरताना मी ती सॅक घेतली… चांगलीच जड होती. १५-२० किलोची तर सहजच असावी. थोडा चाललो आणि त्या सॅकच्या वजनाने माझा तोल जाऊ लागला… उतारावर होतो… सॅक एका बाजूला खेचत होती आणि मला थांबताही येत नव्हतं… खूप प्रयत्न केल्यावर कसाबसा तोल सावरला… थोडक्यात बचावलो… नाहीतर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये “सॅक खाली सापडून एक तरुण सुरगडावर गंभीर जखमी” अशी बातमी आली असती.

सुरगडाची दुसरी आठवण पण पावसाळ्यातलीच आहे. तेव्हा रात्रीच्या शेवटच्या दिवा- रोहा पॅसेंजरने आम्ही रोह्याला उतरलो… प्रचंड पाऊस पडत होता. आम्हाला रोह्याहून STने खांब गावात जायचे होते. म्हणून मग रेल्वे स्टेशनहून आम्ही पहाटे पहाटे रोहा ST स्टॅण्डवर आलो होतो. काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून ST कॅन्टीन मध्ये गेलो. तर तिथे गुडघा-गुडघा पाणी होते. तशाच परिस्थितीत आम्ही शिरा आणि मिसळ मागवली. आम्ही नाष्टा करत असताना भोवतीच्या पाण्यात झुरळ, उंदीर, कुत्रे- अगदी डुक्कर सुद्धा- मनसोक्त संचार करत होते आणि तशाच अवस्थेत आम्ही नाष्टा करत होतो.

बाकी तेव्हा किल्ला काय बघितला होता ते मात्र अजिबात आठवत नाही… असो.
आताचा ट्रेक ठरल्यावर राजश्रीने सुरगडाच्या पायथ्याशी असलेल्या वैजनाथ गावात वाटाड्याची आणि जेवण-खाण्याची सोय करण्यासाठी वैजनाथ गावातील एक उत्साही दुर्ग संवर्धक किशोर सावरकरांना फोन केला. त्यांनीच मग महेंद्र पारठे यांना सांगून आमची एक रात्री राहणे- नाश्ता- दुपारचे जेवण याची सोय केली.
सुरगडाच्या घेऱ्यात असलेल्या झाप, वैजनाथ, घेरा सुरगड अशा काही गावातील लोकांनी ‘स्थानिक सुरगड संवर्धन समिती’ स्थापन केली आहे. ही समिती गेली काही वर्षे सुरगडावर साफसफाई, जमेल तशी डागडूजी, गाडले गेलेले अवशेष शोधणं असं काम करत आहेत. त्यांच्यातलेच किशोर सावरकर एक आघाडीचे कार्यकर्ते आहेत. किशोर सावरकर स्वतः आमच्याबरोबर सुरगड दाखवायला येणार होते. ट्रेकला १५ जणांची नावंही आली होती.

असं सगळं छान जुळून आलं आहे असं वाटत असतानाच ट्रेकच्या चार-पाच दिवस आधी महेंद्र पारठेंचा राजश्रीला फोन आला. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही ज्या मार्गाने सुरगडावरून वरदायिनीच्या देवळाकडे जाणार होतो तिथे खूप अडचणी आहेत आणि मागच्या वर्षीच तिथे एक ग्रुप खूप अडचणीत सापडला होता. तेव्हा त्यांचा rescue करायची वेळ आली होती. या मार्गात खूप जंगल आहे, उतार तीव्र आहे आणि पायऱ्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे तो मार्ग टाळून आम्ही पुन्हा घेरा सुरगड गावात उतरून सोप्या रस्त्याने वरदायिनी मंदीर आणि मग पुढे सरसगड गाठावा असं सुचवलं. त्यानंतर किशोर सावरकरांशी देखील बोलणं झालं. त्यांचंही असंच मत झालं की सुरगडावरून वरदायिनी देवळाकडे उतरणारी वाट कितीतरी वर्ष वापरात नाही. त्यामुळे तिथे उतरणे हे जरा जिकीरीचं काम आहे. त्या दोघांचीही काळजी अगदी रास्त होती. आपल्या परिसरात येणारे ट्रेकर कुठल्याही अडचणीत सापडू नयेत अशीच त्यांची विशुद्ध भावना होती. त्यामुळे आम्हीदेखील थोडे विचारात पडलो. जी वाट करण्यासाठी म्हणून ट्रेक ठरवला तीच वाट न करणं हे मनाला काही केल्या पटेना आणि त्या दोघांच्याही म्हणण्याकडे दुर्लक्षही करता येईना. तेव्हा आम्ही किशोर आणि महेंद्रला समजावून सांगितलं की आपण ठरलेल्या मार्गानेच जाऊ आणि वाटेत फारच अडचण वाटली तर मग धोका न पत्करता परत येऊन त्यांनी सुचवलेल्या सोप्या रस्त्याने वरदायिनीला जाऊ. हे ऐकून बहुधा त्या दोघांचा जीव भांड्यात पडला.

शनिवारी म्हणजे २९ नोव्हेंबरला रात्री एकच्या सुमारास आम्ही घेरा सुरगड गावात पोचलो. थोडीफार झोप काढली, चविष्ट पोह्यांचा नाश्ता केला आणि रविवारी सकाळी साडेसहा वाजता गडावर जायला निघालो.
सुरगड तसा चढायला सोपा आणि कमी वेळ लागणारा किल्ला आहे. जेमतेम आठ-नऊशे फूट उंची आहे. रुंदी तर फारच कमी म्हणजे काही ठिकाणी तर अगदी पन्नास फुट असावी. त्यामुळे किल्ला झटपट बघून वरदायिनी देवळाकडे जायचं असं आम्ही ठरवलं होतं.

गड चढाई करताना अर्थातच किशोर सावरकर सर्वात पुढे होते. गडावर प्रेम असलेला, गडाची माहिती असलेला आणि ती माहिती सर्वांना खुल्या मनाने द्यायला तयार असणारा माणूस बरोबर असला की काय होतं ते त्या दिवशी सुरगडावर केलेल्या भटकंतीत आम्ही अनुभवलं. किशोरना किल्ला अगदी तळहातावरच्या रेषेसारखा माहीत आहे. किल्ल्यावरील प्रत्येक इमारतीचा अवशेष नि अवशेष, पाण्याची टाकी, गुहा, भुयार, देवळं, बुरुज, गडावर असलेल्या तोफा …. असं कितीतरी किशोरनी त्यादिवशी आम्हाला दाखवलं. याआधी सुरगड बघितला तेव्हा यावेळच्या दहा टक्केही किल्ला बघितला नव्हता. सुरगडासारख्या एका छोटेखानी किल्ल्यावर इतके अवशेष असतील याची कल्पनाही केली नव्हती.
दशकानुदशके मातीच्या, गवताच्या, पाला-पाचोळ्याच्या ढिगाखाली लपलेले अनेक पुरातन अवशेष शोधून काढणारी किशोर आणि त्याच्या सोबतची ग्रामस्थ मंडळीच आहेत… गेली किती तरी वर्ष ते या कामासाठी अफाट कष्ट घेत आहेत… त्यांना गड माहीत नसणार तर दुसऱ्या कोणाला असणार?

जेव्हा सदरेवर गेलो तेव्हा तिथे जवळच दहा-बारा स्वयंसेवक तटबंदीत साफसफाई करताना दिसले. कुदळ फावडं घेऊन ते तटबंदीतील मातीच्या ढिगाऱ्याखाली लपलेला शौचकूप स्वच्छ करत होते. विशी-पंचविशीतील ती मुलं बघून मला ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गाणं आठवलं… प्रसंग जरी वेगळा असला तरी वृत्ती तीच होती… कुठलाही स्वार्थ न बघता शिवकार्यासाठी स्वतःला झोकून देण्याची…
सुरगड असा अगदी तपशीलवार बघता-बघता चार तास कसे निघून गेले आमचे आम्हालाच कळले नाही. किशोरबरोबर किल्ला बघायला खरं तर अजून चार तास सुद्धा कमी पडले असते. पण पुढे निघणे भाग होते. अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा होता…

आम्ही सतीच्या माळाकडे जाणाऱ्या वाटेने उतरू लागलो. ज्या वाटेतील अडचणीची किशोर आणि महेंद्रला काळजी वाटत होती तोच हा भाग होता. त्यांची भीती अगदीच अनाठायी नव्हती. कोरड्या गवताखाली लपलेली पायवाट, काही ठिकाणी तुटलेल्या पायऱ्या, मातीचा घसारा… काळजीपुर्वकच उतरावे लागत होते. असे जवळपास चारशे फुट उतरून आम्ही एका भुयारापाशी पोचलो. अगदी रेखीव पद्धतीने खोदलेले ते भुयार जवळ जवळ किल्ल्याच्या पोटात ८० फुट जाते. ते देखील ग्रामास्थानीच शोधून काढले आहे. तिथून जवळच सतीची एक समाधी आहे. बहुधा म्हणूनच त्याला सतीचा माळ म्हणत असावेत.
वाटेतील तो कठीण भाग उतरून झाल्यावर किशोर सावरकर परत जाणार होते. पुढील वाट माहीत असलेला चंद्रकांत पुढे आमच्याबरोबर असणार होता. किशोर सावरकरांना निरोप देताना सर्वांनीच त्यांनी आणि ग्रामस्थांनी हाती घेतलेल्या कार्याला मनापासून दाद दिली. सावरकर हे नावच असे आहे की त्यांच्या हातून समाजकार्य होणारच…
सतीच्या माळावरून आमचा पुढचा प्रवास सुरु झाला… एव्हाना अकरा वाजले होते. हवेत उष्मा जरी थोडासा वाढला असला तरी अधून मधून वाहणारी वाऱ्याची झुळूक वातावरण प्रसन्न ठेवत होती. सतीचा माळ ते वरदायीनी मंदीर ही वाट अतिशय छानच आहे… कुठेही फारसा चढ-उतार नाही… कुठे दाट जंगलातून तर कुठे वाळलेल्या गवतातून वाटचाल… मधूनच वाहणारे छोटे छोटे प्रवाह… तिथे काही क्षण थांबून पाणी अंगावर घेणे… एक- दीड तासाची ती चाल अगदी एखाद्या निसर्गचित्रासारखी होती. ती चालता- चालता वरदायिनीचे देऊळ कधी आले हे देखील कळले नाही.

सव्वा- बारा वाजता आम्ही अत्यंत रमणीय परिसरात असलेल्या त्या देवळात पोचलो… आजूबाजूला दाट जंगल…थोडंसं खालीच बारमाही वाहणारा झरा… त्यात खास डुंबण्यासाठी एक टाकं… आमच्यापैकी काही उत्साही मंडळींनी डुंबण्याची हौस तिथे भागवून घेतली.
दुपारच्या जेवण्याची वेळ, जेवण्यासाठी असं सुंदर ठिकाण आणि सकाळपासून सहा तास चालून लागलेली भूक… त्यात महेंद्र पारठे यांनी चुलीवर बनवून दिलेल्या पोळ्या आणि अप्रतिम चवीची चटकदार मटकी उसळ आणि दाण्याची चटणी … बरोबर आणलेले सगळे जेवण अगदी सहजच संपून गेले…
आमचं पुढचं लक्ष्य होतं झाप गाव. त्यासाठी अजून जवळपास तीन तास चाल आणि नंतर सरसगड…आता वातावरण थोडे ढगाळ झाले होते. हवेत उष्माही वाढला होता. साहजिकच जेवल्यानंतर सगळ्यांचा चालायचा वेग थोडा मंदावला…
झाप गावाकडे जाताना आधी ठाकुरवाडी लागते आणि त्याआधी एक विस्तीर्ण माळ लागतो. तिथून खाली उतरून ठाकुरवाडी डावीकडे ठेवून आपण सिद्धेश्वर मार्गे झाप गावाकडे उतरतो.
ठाकुरवाडी सोडून अर्ध्या तासातच आम्ही सपाटीवरचे सिद्धेश्वर गांव गाठले. आता मात्र चांगलंच उकडायला लागलं होतं… त्यात पुढचा पाऊण तास सपाटी मारायची होती… ती डांबरी /सिमेंट रस्त्यावरून… ती मात्र अगदीच नकोशी झाली होती… पण show must go on…
झाप गांव पार करून संध्याकाळी चार वाजता आम्ही सरसगडाच्या पायथ्याशी पोचलो… सकाळी चालायला सुरवात करून आता नऊ तास होऊन गेले होते. चालून-चालून सगळेच दमले होते. पण आता सरसगड करायचाच ही सगळ्यांची जिद्द होती. कुणीच नाही म्हटलं नाही.
सरसगडाच्या शेवटच्या भागातील पायऱ्या चांगल्याच खड्या आणि उंच आहेत. त्यात आता काळोखही लवकर पडतो. म्हणून काहीही करून परतीच्या वेळी काळोख पडायच्या आत आम्हाला त्या पायऱ्यांचा भाग उतरून पुढच्या सोप्या वाटेला लागायचं होतं.
आपापले टॉर्च, पाणी, बरोबर खाऊ असं एकदा चाचपून घेतलं आणि सरसगडाकडे निघालो. दमले असले तरी सगळ्यांनी चालण्याचा चांगला वेग पकडला होता. इतका की सव्वा-पाच वाजता आम्ही बालेकिल्ल्यावर होतो. तिथून सूर्यास्त बघितला आणि लगेचच उतरायला सुरवात केली. त्या खड्या पायऱ्या उतरून खाली येईपर्यंत अंधारून आलं होतं. पण पुढची वाट सोपी होती त्यामुळे काळजी नव्हती.
आता ट्रेक संपायला थोडाच अवधी उरला होता… पुढची वाट सोपी होती… इतक्या वेळ शांत असलेला चमू आता गप्पा मारायला लागला… शीण कुठल्याकुठे पळून गेला… एकमेकांची टवाळी करत काळोखात उरलेली वाट उतरून सरसगडाच्या पायथ्याशी पोचलो तेव्हा सात वाजले होते…
साडेबारा तासांची एक झकास भ्रमंती आता पूर्ण झाली होती… तेवीस कि. मी. चाल, दोन किल्ले चढ उतार आणि मधल्या मार्गावर एक अविस्मरणीय भटकंती झाली… शरीरं थकली होती पण मनं मात्र ताजी तवानी होती…
सकाळी सुरगडावर सूर्योदयाच्या वेळी सुरू झालेली एक आनंद यात्रा सरसगडावरचा सूर्यास्त बघून संपली…
महेश भालेराव
०३/१२/२०२५
ता. क. सोबतचे सर्व फोटो या ट्रेकमधील माझ्या सोबत्यांनी काढले आहेत.
 

Add a Comment

Your email address will not be published.