गणीची वाट – ढाक – गाळदेवी घाट – भिवगड
मी पुन्हा येईन…
गेली अनेक वर्ष सह्याद्रीत भटकंती झाली आहे. दक्षिणेतील सिंधुदुर्ग ते उत्तरेतील साल्हेर पर्यंतचे कितीतरी किल्ले बघून झाले. पण ही भटकंती करताना अगदी जवळचे काही किल्ले मात्र राहून गेले होते. त्यात पाली जवळचा सुधागड, रोह्याजवळचे अवचितगड, तळा, घोसाळा हे किल्ले बघायचे राहिले आहेत. तसाच एक किल्ला बघायचा राहून गेला होता तो म्हणजे कर्जत जवळचा भिवगड. तो किल्ला बघून झाला तो काल-परवाच झालेल्या चक्रम हायकर्सच्या ट्रेकमध्ये.
दोन-तीन आठवड्यांपूर्वी राजश्री कामथने भिवगड किल्ला – गणीची वाट- गाळदेवी घाट असा ट्रेक करायचे सुतोवाच केले होते. कुठल्याही ट्रेकचे नेतृत्त्व करण्यापूर्वी शक्य असेल तर तो ट्रेक आधी करून यायचा असा राजश्रीचा प्रयत्न असतो. त्याप्रमाणे ती ट्रेकला जाऊन आली, ट्रेक करण्यात कुठलीही अडचण नाही याची तिला खात्री झाली आणि मग हा ट्रेक करायचे ठरले.
ट्रेकसाठी १५ जण तर सहजच जमले. रविवारी म्हणजे १६ तारखेला सकाळी नऊ वाजता आम्ही भिवगडाच्या पायथ्याच्या गौरकामत गावातून ट्रेकला सुरवात केली आणि संध्याकाळी पावणे पाच वाजता संजय नगरला ट्रेक संपवला. या सात आठ तासाच्या एका छान ट्रेकची ही क्षणचित्रं…
– भिवगड एक छोटेखानी किल्ला आहे. पायथ्यापासून जेमतेम अर्ध्या तासाची चढाई केली आणि आम्ही माथ्यावर पोचलो.
– वाटेत उध्वस्त पायऱ्या आहेत. दोन गुहाही दिसतात. त्यातल्या एका गुहेत शेकडो वटवाघळं होती. त्यांचा चक-चक आवाज लांबूनच ऐकू आला. जवळ गेल्यावर मात्र त्यांच्या विष्ठेची इतकी घाण आली की अक्षरशः मळमळायला झालं .
– गड छोटेखानी आहे. दगडात कोरलेल्या पण आता उध्वस्त झालेल्या पायऱ्या आहेत आणि सुरक्षेसाठी त्यांची रचना गोमुखी आहे हे जाणवलं.
– भिवगडाच्या माथ्याचा आकार साधारण उलट्या ठेवलेल्या होडीसारखा आहे. गडावर बारा पंधरा टाकी आहेत. माथ्यावर एका घराचे जोते आहे, देऊळ आहे.
– असं सगळं बघायला अर्धा तास पुरला.
– भिवगड उतरून आम्ही पोचलो ते गौरकामत आणि संजय नगरकडे जाणाऱ्या वाटा जोडणाऱ्या खिंडीत.
– तिथून ढाक पठाराची चढ़ाई सुरू झाली.
– ती चढाई मात्र झकास होती. कधी दाट जंगल तर कधी गवतातून जाणारी वाट… कधी अगदी तांबड्या मातीची पायवाट तर कधी दगडधोंड्याची वाट… यावर्षी उशिरापर्यंत पाऊस झाल्याने मध्येच एखाद्या ओढ्यात अजूनही झुळूझुळू वाहणारे पाणी
– अर्ध्या चढाईनंतर लागला तुळशीचा माळ. तिथे हिरव्यागार झाडांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारी अक्षरशः हजारो तिळाची फुलं… त्यावर पडलेले सूर्यकिरण… त्यामुळे अजूनच उठून दिसणारा त्या फुलांचा भगवा रंग… त्या फुलांच्या अवतीभवती उडणारी फुलपाखरं… दृष्टी खिळवून ठेवणारे ते निसर्गदृश्य होतं.
– त्या तुळशीच्या माळावर कुडाच्या भिंतीची, शेणाने सारवलेली चार-पाच घरं होती. आजूबाजूला बिबट्याच्या वावराची भीती होती.
– तिथून वर पोचलो ते गणीची वाट आणि गाळदेवी घाटाच्या वाटा जिथून वेगळ्या होतात त्या जागी.
– आम्ही ढाकच्या पठारावर जाणार होतो ते गणीच्या वाटेने. ती चढाई सौम्य, जंगलातून जाणारी आणि मोठ्या पायवाटेची होती.
– जंगलातून जाणाऱ्या त्या पायवाटेवर काही ठिकाणी भूस्खलन झालेलंही कळलं. पण तिथे जाणवलेले एक अनोखे वैशिष्ट्ये म्हणजे काही झाडांची मुळं… मोठमोठे धोंडे त्या मुळानी धरून ठेवले होते. मातीच्या सतत होणाऱ्या धुपेने काही झाडांची जाडजूड मुळं जमिनीच्या फूट- दोन फूट वरच दिसत होती… एकात एक घुसलेली ती मुळं जणू एकमेकांशी कुस्ती खेळत आहेत असंच वाटून गेलं.
– गणीची वाट चढून ढाकच्या पठारावर पोचलो आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर अंगठेसरीच्या माथ्यावरून घोणसपुरापर्यंत केलेली सह्यधारेवरची चाल आठवली… क्षितिजावर राजमाचीचे दोन्ही बालेकिल्ले- श्रीवर्धन आणि मनरंजन- लगेचच लक्षात येत होते.
– गारू आईच्या देवळाचा परिसर पाहून तर ” इथेच टाका तंबू ” असंच वाटून जातं. छान वारा.. पठारावर पसरलेला हिरव्या, तपकिरी गवताचा गालिचा… त्या गवतात फुललेले जांभळ्या रंगाचे असंख्य तुरे…
– पठाराच्या एका टोकाला दिसणारा ढाकचा किल्ला एका क्षणी रायगडासारखा वाटला. त्या पल्याड विस्तीर्ण पसरलेलं कुसूर पठार दिसलं आणि कितीतरी वेळा केलेल्या लोणावळा- भीमाशंकर ट्रेकची आठवण झाली…
– त्या पठारावर मोजकीच दोन-तीन घरं आहेत. एका घरात दहा-बारा म्हशी आणि साठ-सत्तर तरी गायी असतील. साहजिकच अस्सल गावरान खवाही तिथे मिळाला.
– परतीचा प्रवास सुरू झाला तो गाळदेवी घाटातून. ती वाट मात्र अगदी तीव्र उताराची होती पण कुठेही भीतीदायक नव्हती.
बऱ्यापैकी वेगाने उतरत आम्ही पायथ्याच्या संजय नगर गावात पोचलो तेव्हा एक मस्त ट्रेक केल्याचं समाधान लाभलं होतं… एका चांगल्या ट्रेकसाठी लागणारं सगळं काही त्या सात-आठ तासात अनुभवलं… दाट जंगलातली चाल, असंख्य रानफूलं, सह्यधारेवरची चाल, कस पाहणारा उतार, विस्तीर्ण माळरानावरचा आल्हाददायक वारा… आणि या सर्व अनुभवाची गोडी वाढवणारे ट्रेकमधील सोबती… कुणी अबोल तर कुणी सबोल( कमी बोलणारा अबोल असेल तर मग जास्त बोलणारा सबोल का नाही?), कधी टवाळी करत तर कधी जुन्या आठवणींना उजाळा देत… कधी कॅमेऱ्यात दृश्य टिपत तर कधी शांतपणे वाटचाल झाली…
या परिसरातील घाट वाटा, ढाक पठारावरून ढाकची चढाई, त्या पठारावरील उघड्यावरच्या मुक्कामाची भुरळ…
अशा कितीतरी गोष्टी करण्यासाठी पुन्हा – पुन्हा या परिसरात निश्चितच जाणं होणार आहे…
महेश भालेराव
१७. ११. २०२५
ता. क. : या पोस्टसोबतचे फोटो माझे ट्रेकमधील सहकारी राजन महाजन, सागर पटवर्धन, मकरंद सदावर्ते, सुधीर जायभाये आणि वंदना डेंगळे यांनी काढले आहेत.
Recent Posts
Chakram Hikers0 Comments
चक्रम
Chakram Hikers0 Comments
दसरा पूजा @ चक्रम हायकर्स, मुलुंड ऑफिस
Chakram Hikers0 Comments
पेठ-काऊल्याची-धार-नाखिंदा-भोगदा-पढरवाडी-नाखिंदा घाट-आंबिवली
Tags
ambivali trek
bhimashankar trek
bhivgad fort trek
dasra puja 2025
dhak fort trek
fort sarasgad
fort surgad
galdevi ghat
ganichi vaat
kaulyachi dhar
kothaligad trek
kurvande trek
nakhinda ghat
panhalgad to vishalgad trek
panhalgad trek
pavankhid trek
savardand
surgad to sarasgad trek
takmak trek
umbarkhind trek