टकमक ट्रेक
पालघर – डहाणू परिसरात माझं ट्रेकिंग तसं फारच कमी झालं आहे. पंधरा- वीस वर्षांपूर्वी झालेले तांदुळवाडी, कोहोज आणि याच वर्षी बघितलेले विवळवेढे, बारडगड, गंभीरगड वगळता त्या परिसरात इतर कुठलेही किल्ले बघितल्याचे मला आठवत नाही. त्यामुळे जेव्हा ‘सर्क्युलरवर टकमक’ किल्ला करायचा का?’ हे विचारायला अनिकेत रहाळकरचा फोन आला तेव्हा मी लगेचच तयार झालो. तारीख ठरली २० सप्टेंबर, शनिवार. पण काही कारणाने ऐनवेळी अनिकेतचे ट्रेकला यायचे रद्द झाले आणि ट्रेकला आम्ही सहाजणच उरलो .
अतुल आणि आरती अगरवाल, डॉ. धनंजय देऊळकर, राजन महाजन, नचिकेत घटे आणि मी असे आम्ही सहा जण २० तारखेला सकाळी ठरल्याप्रमाणे पावणे सहा वाजता ठाण्याहून निघालो. घोडबंदर रोडला ट्रॅफिक लागलं पण फार खोळंबा न होता आम्ही साडे-आठ वाजता सकवार गावात पोचलो.
गावात वाटाड्याची चौकशी केल्यावर एका मामांनी विराज नावाच्या एका मुलाला बोलावून आणले. तो डोळे चोळत चोळत आला. मामांनी बहुधा त्याला गाढ झोपेतून उठवून आणले होते. ढगळ हाफ चड्डी, नायलॉनचा शर्ट आणि पायात स्लीपर असा विराजचा अवतार होता. मी त्याला वाटेबद्दल विचारलं. तेव्हा तो खास आदिवासी शैलीत म्हणाला की हप्त्यात दोनदा पण किल्ल्यावर जातो. मामा पण म्हणाले की काळजीचं कारण नाही. तेव्हा विराजसोबत आम्ही किल्ल्याकडे निघालो.
सकवार गावातून साधारण अर्ध्या तासाची सपाटी चालून गेल्यावर किल्ल्याची चढाई सुरू होते. आधीचे दोन-तीन दिवस चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे वाटेत ठिकठिकाणी चिखल होता. त्या चिखलात घोट्यापर्यंत पाऊल सहज रुतत होते… क्वचित पाऊल बाहेर आणि बूट आत असंही होत होतं… Walking stick तर हमखास रुतत होत्या… अशी अर्धा तास पकडापकडी केल्यावर वाट चढायला लागली ती दाट जंगलाच्या पट्ट्यातून. त्या जंगलाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मोठमोठी पानं असलेली सागाची झाडं. चालताना वातावरण जरी ढगाळ होते तरी हवेत गारवा असा नव्हताच. चढ लागल्यावर थोड्याच वेळात अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. साहजिकच आमचा चालण्याचा वेग थोडा मंदावला.
सकवार गावातून टकमक किल्ल्याकडे जाणारा मार्ग चांगला रुळलेला आहे. एखाद-दोन ठिकाणी वाट थोडीशी झुडपात हरवल्यासारखी वाटते. पण बाकीची पायवाट ठळक आहे. त्यात विराजला वाटेची चांगलीच माहिती होती. त्यामुळे वाट चुकण्याची भीती अशी नव्हतीच. टणाटण उड्या मारत विराज पुढे चालला होता आणि मागे रमत-गमत गप्पा मारत आम्ही सहा जण…
आम्ही एकेक टप्पा चढून जात होतो. पहिले दोन टप्पे सौम्य चढाचे आहेत आणि दाट जंगलातून जातात. नंतरची चढाई मात्र चांगलीच खडी आहे. हे टप्पे चांगलेच फसवे आहेत. समोर दिसणारा खडा चढ आपण चढून गेलो की लगेचच त्याच्यामागे लपलेला दुसरा चढ दिसतो… मग एक सोंड… मग पुन्हा चढ… असे साधारण सहा टप्पे चढून गेलो की आपण माथ्यावर पोचतो. टप्प्या – टप्प्याने उलगडत जाणारा टकमक किल्ला पावसाळ्यात चढणे हे निश्चितच सोपे काम नाही. जरी कुठेही exposure नसलं तरी पावसाळ्यात दगड खूपच निसरडे झाले असल्याने निदान चार-पाच ठिकाणी तरी अतिशय काळजीपूर्वक चालावे लागते.
पहिल्या दोन टप्प्यांची वाट जंगलातून जाते. नंतरची चाल निमुळत्या सोंडेवरून आहे. त्या सोंडेच्या एकाबाजूला उघडीप होती. इतकी की दूर क्षितिजावर पश्चिमेला समुद्राला मिळणारी वैतरणा नदीही दिसत होती तर त्या सोंडेची दुसऱ्या बाजूचा परिसर मात्र ढगात गेला होता. हे दृश्य त्यानंतर जवळपास दिवसभर असेच होते. जणूकाही त्या सोंडेने एक अदृश्य सीमा रेषाच आखून दिली होती…
जसजसं जंगल विरळ होऊ लागलं तसतशी गवतात फुललेली रानफुलं दिसू लागली… पिवळी धम्मक सोनकी, गर्द गुलाबी तेरडा, गौराई, रान भेंडी अशी पाच सहा प्रकारची तरी फुलं त्या पायवाटेच्या आजूबाजूला दिसत होती.
चालता- चालता अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्या टप्प्यावर सोंडेच्या पश्चिमेच्या उतारावर सगळीकडे फक्त सोनकीची पिवळी फुलंच होती तर पूर्वेच्या उतारावर फक्त गुलाबी तेरडा दिसत होता. त्यात निमुळत्या सोंडेवर मधून जाणारी पायवाट… एका बाजूला पिवळ्या तर दुसऱ्या बाजूला गुलाबी रंगाची अशी आखीव रेखीव उधळण मी तरी सह्याद्रीत पाहिली नव्हती… ते मोहक दृश्य टिपण्यासाठी इतका वेळ सॅक मध्ये असलेले सगळ्यांचे मोबाईल आपोआप बाहेर आले…
तो डोंगर टप्पा पार करून पुढे गेल्यावर अजून एक वेगळे दृश्य दिसले… डोंगर सोंडेच्या एका बाजूला पूर्ण रानकेळी तर दुसऱ्या बाजूला रानफुलं… खालच्या सोंडेवर एकमेकांपासून अगदी फटकून असलेली सोनकी आणि तेरडा इथे मात्र एकमेकात अगदी मिसळून गेले होते. निसर्गाने जणू काही त्या उतारावर फुलांची रांगोळीच काढली होती…
चालता- चालता विराजने दोन-तीन सोनकीची फुलं सहज कानावर ठेवली. सतत निसर्गाच्या सान्नीध्यात राहणाऱ्या वनवासी लोकांना फुलांची आवड उपजतच असते… कानावर दोन सोनकीची फुलं ठेवलेला विराजचा चेहरा अतिशय निरागस आणि लोभसवाणा दिसत होता… त्याचा राजन महाजनने टिपलेला फोटो पोस्ट सोबत दिला आहे.
टकमक किल्ल्याच्या शेवटच्या तीन टप्प्यातील चढाई खडी तर होतीच पण वाटेतले दगड- धोंडेच काय पायवाट देखील चांगलीच निसरडी झाली होती. त्यामुळे खूप काळजी घेऊन चालावे लागत होते. त्यामुळे चढाईला आम्हाला तासभर जास्तच लागला. पावणे नऊ वाजता चालायला सुरवात केल्यानंतर बरोबर चार तासांनी आम्ही माथ्यावर पोचलो.
टकमक हा टेहळणीचा किल्ला असल्याने आणि ब्रिटिश काळात झालेली हानी यामुळे गडावर फार अवशेष नाहीतच. त्यात आम्ही पोचलो तेव्हा गडाचा माथा ढगात पार हरवून गेला होता. त्यामुळे आजूबाजूचा परिसर दिसत नव्हता. मग जेवढे दिसतील तेवढे म्हणजे दोन टाकी, देऊळ, थोडीशी तटबंदी, काही पायऱ्या असे अवशेष आम्ही छोट्या गडफेरीत बघितले आणि जेवून लगेचच किल्ला उतरायला सुरवात केली.
पायवाट आणि वाटेतले दगड खूपच निसरडे झालेले असल्याने खूप काळजीपूर्वक उतरावे लागत होते. त्यामुळे चढताना लागला त्यापेक्षा जास्त वेळ उतरताना लागत होता. तेव्हा राजनला बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या “राजा शिवछत्रपाती” पुस्तकात पावसाळ्यातील सह्याद्रीचे वर्णन आठवले. उडत्या पक्ष्याच्या पंखावर सुद्धा शेवाळं जमा होतं अशा अर्थाचं ते वर्णन होतं. इथे ते तंतोतंत लागू होत होतं. इतिहासाचा विषय निघाला आणि मग किल्ल्याचे नांव टकमक ठेवले असावे यावर ‘ विचारमंथन ‘ सुरू झाले. दोन्ही बाजूला खोल दरी असलेल्या रायगडाच्या टकमक टोकाकडे जायचा मार्ग आणि टकमक किल्ल्यावर जायचा मार्ग यात साधर्म्य असल्याने या किल्ल्याचेही नांव टकामक पडले असावे असा निष्कर्ष निघाला.
सावकाश गड उतरून सकवार गावात परत येईतो साडेपाच वाजले होते. काहीसा थरारक पण निश्चितच एक छान ट्रेक केल्याचे समाधान मिळाले होते. आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो ते गडमाथ्यावरून बघायचे राहिलेले आजूबाजूचे विहंगम दृश्य बघण्यासाठी पुन्हा कधीतरी या किल्ल्याची फेरी मारायची हा निश्चय करूनच…
महेश भालेराव
२३/०९/२०२५
ता.क. या पोस्ट सोबतचे फोटो ट्रेकमधील माझे सोबती राजन महाजन, नचिकेत घटे आणि डॉ. धनंजय देऊळगावकर यांनी काढलेले आहेत.
Tags:takmak trek
Recent Posts
Chakram Hikers0 Comments
चक्रम
Chakram Hikers0 Comments
दसरा पूजा @ चक्रम हायकर्स, मुलुंड ऑफिस
Chakram Hikers0 Comments
पेठ-काऊल्याची-धार-नाखिंदा-भोगदा-पढरवाडी-नाखिंदा घाट-आंबिवली
Tags
ambivali trek
bhimashankar trek
bhivgad fort trek
dasra puja 2025
dhak fort trek
fort sarasgad
fort surgad
galdevi ghat
ganichi vaat
kaulyachi dhar
kothaligad trek
kurvande trek
nakhinda ghat
panhalgad to vishalgad trek
panhalgad trek
pavankhid trek
savardand
surgad to sarasgad trek
takmak trek
umbarkhind trek