रणशील आणि घोगोल घाट मार्गे भीमाशंकर
येतो तो तो क्षण अमृताचा…
खरं तर ५/६ जुलैला नाणेघाट परिसरातील शिदोबाची धार – तिरंगी घाट या दोन घाटवाटांचा ट्रेक करायचा होता. पण ज्या वाटाड्याच्या भरवशावर आम्ही हा ट्रेक करणार होतो त्या काटेवाडीच्या हरिभाऊशी ट्रेकच्या पंधरा दिवस आधी फोनवर बोलणे झाले तेव्हा तो म्हणाला की खूप पाऊस झाल्याने दोन्ही ठिकाणी वाट अवघड झाली आहे. त्यामुळे ट्रेक पुढे ढकललेला बरा असं त्याचं म्हणणं पडलं.
तसा तिरंगी घाट मी या आधी तीनवेळा केला होता आणि तोही भर पावसाळ्यात. या वर्षी तर अजूनही तसा फार मुसळधार पाऊस सुरू झाला नव्हता. त्यामुळे हरिभाऊंचं म्हणणं थोडं न पटण्यासारखं वाटलं. पण आता हरिभाऊ म्हणतोच आहे तर त्याची खात्री करून घेतलेली बरी असा विचार करून मी आणि राजश्री कामथ लगेचच काटेवाडीला गेलो. तिरंगी घाट चढून मग शिदोबा दार उतरणे असा उलट्या क्रमाने ट्रेक करायचं ठरवलं.
वाघाच्या वाडी या गावातून सुरवातीची साधारण अर्ध्या तासाची सपाटी मारल्यावर तिरंगी घाटाची खडी चढाई सुरू होते. संपूर्ण चढाई एका वाहत्या धबधब्याच्या बाजूने आणि अधून मधून धबधब्यातून आहे. चालताना आम्हाला वाटेत काही ठिकाणी छोट्या दरडी कोसळल्याचे दिसत होते. काही ठिकाणी झाडेही पडलेली दिसत होती. वाटेतले खडक चांगलेच निसरडे होते. अगदी जपून चालावे लागत होते.
साधारण अडीच तासात आम्ही निम्म्यापेक्षा जास्त तिरंगी घाट चढून गेलो होतो. चालता – चालता एका वळणावर समोर तिरंगी घाटाच्या माथ्यावरून पडणारा धबधबा दिसला… तोच धबधबा उड्या मारत खाली येत होता आणि आम्ही त्याच्या अगदी जवळून चालत होतो. खळाळून वाहणाऱ्या त्या पाण्याची गाज त्या दरीत चांगलीच घुमत होती. तो धबधबा पाहून क्षणभर स्तब्ध व्हायला झाले…
पुढे जाण्यासाठी तो धबधबा ओलांडावा लागणारच होता. पण धबधब्याचा प्रवाह खूपच जास्त वाटत होता. म्हणून चालत तसेच थोडं पुढे जाऊन बघितलं.पण आगे-मागे कुठेही तो ओलांडून जायचा सोपा मार्ग दिसत नव्हता. आम्ही होतो त्या ठिकाणाहून तो धबधबा ओलांडणे तर सोडाच त्यात पाऊलही टाकायची आमची हिंमत झाली नाही. त्यात पुढची सगळी चढाई धबधब्याच्या वाहत्या प्रवाहातूनच करायची होती आणि अजूनही सात- आठशे फूट तरी चढून जायचे होते. वरती नजर टाकली तर धबधाब्याचा प्रवाह जास्तच रौद्र वाटत होता. आभाळही आता बऱ्यापैकी दाटून आले होते.
तेव्हा ‘ शीर सलामत तो पगडी पचास’ या म्हणीनुसार आम्ही पुढे जायचं रद्द केलं. उतरताना हेही ठरवून टाकलं की धो-धो पडणाऱ्या पावसात हा ट्रेक करणेच मुळात धोकादायक ठरेल आणि म्हणून तो रद्द करण्याबद्दल माझे आणि राजश्रीचे एकमत झाले.
आता मग त्याला पर्याय शोधणे सुरू झाले. परतीच्या प्रवासात माळशेज घाट परिसरातील काही वाट घाटा करता येतील का याची चाचपणी कारण्यासाठी एक दोन वाटाडयांना फोनही केले. पण त्यांनी सुचवलेल्या सगळ्या वाटा झाल्या होत्या आणि ज्या झाल्या नव्हत्या त्या पावसाळ्यात करता येणार नव्हत्या.
असा विचार करता करता राजश्रीने भीमाशंकर परिसरातल्या घाटवाटा करायचा पर्याय सुचवला. दोन वर्षांपूर्वी ती पदरगडावर गेली असताना तिचा घोगोळ घाट ट्रेक झाला होता. पावसाळ्यानंतर ती रानशील घाट-भीमाशंकर-घोगोळ घाट असा ट्रेक करायचा विचार करतच होती. पावसाळ्यात रानशील घाट करता येईल याची तिला खात्री होती पण घोगोळ घाट करता येईल की नाही याची तिला खात्री नव्हती. म्हणून एका स्थानिक वाटाड्याला फोन केला तेव्हा त्याने सांगितले की वाटेत काही ठिकाणी तो निसरडा असू शकेल आणि पर्याय म्हणून गणेश घाट करायचं सुचवलं. गणेश घाट तसा रुळलेला मार्ग असल्याने बऱ्याच लोकांचा तो झालेला असतो. पण घोगोळ घाट फारसे लोक करत नाहीत. म्हणून मग रानशील घाट-भीमाशंकर-घोगोळ घाट असाच ट्रेक करायचा ठरवलं. वेळ मिळाल्यास गुप्त भीमाशंकराला भेट द्यायची असंही ठरवलं. लगेचच आम्ही सर्व सहभागीना ट्रेकचा बदललेला मार्ग कळवला. त्याला कुणाचीच ना नव्हती.
ट्रेक तर ठरला … पण वाटाड्या म्हणाला ते राजश्रीच्या डोक्यातून जात नव्हते. म्हणून ट्रेकच्या जेमतेम चार-पाच दिवस आधी खबरदारी म्हणून राजश्री रानशील घाट- भीमाशंकर- घोगोळ घाट ट्रेक करून आली. घोगोळ घाट वगळता इतर मार्गात काहीच अडचण नव्हती. मात्र घोगोळ घाटात सुरवातीचे चार-पाचशे फूट वाट दगड धोंड्यातून उतरते आणि त्यातील वाहत्या पाण्याने ती बरीच निसरडी झाली होती. वाट करणे अशक्य नाही पण काळजीपूर्वक उतरावे लागेल आणि त्यामुळे वेळ जास्त लागू शकेल असं राजश्रीचं म्हणणं पडलं. एक चांगली गोष्ट म्हणजे वाटेत कुठेही exposure नव्हते की पाण्याचा प्रवाह फार वेगवान नव्हता. घोगोळ घाट आणि गणेश घाट यांचा सुरवातीचा जवळ जवळ अर्ध्यापेक्षा मार्ग सारखाच आहे आणि एका विहिरीजवळ ते वेगळे होतात. अगदीच जर अडचण झाली असती तर ऐनवेळी गणेश घाटातून जायचा सुरक्षित पर्याय उपलब्ध होताच. त्यामुळे घोगोळ घाटानेच उतरायचं ठरवलं. हाताशी पुरेसा वेळ असावा म्हणून मग गुप्त भीमाशंकराला भेट द्यायचे आधीच रद्द करून टाकले.
सहा तारखेला सकाळी ठरल्याप्रमाणे पहाटे ५. ३० वाजता आम्ही १५ जण ट्रेकला निघालो. वाटेत कर्जत येथील ठाकरे हॉटेलमध्ये नाश्ता आटोपून रानशील घाटाच्या पायथ्याच्या नांदगावाला पोचेपर्यंत पावणे नऊ आणि ट्रेक सुरू करेपर्यंत नऊ वाजले….
रानशील घाटाला बैल घाट आणि टेम्भूर्णी घाट अशीही नांवे आहेत. ओझे घेऊन बैल ये-जा करू शकतात म्हणून बैलघाट आणि आजूबाजूच्या जंगलात टेम्भूर्णीची खूप झाडं आहेत म्हणून टेम्भूर्णी घाट. घोगोळ घाटात खूप गोगलगायी दिसतात म्हणून त्याला घोगोळ घाट म्हणतात अशी माहिती आम्हाला वाटाड्याने सुरवातीलाच दिली.
त्या दिवशी हवा मात्र छानच होती. वातावरण ढगाळ होते. अधून-मधून पाऊस पडत होता. भीमाशंकरचा माथा ढगात हरवला होता… पाऊस आता चांगला सुरु झाल्याने लहान मोठे धबधबे आजूबाजूला दिसत होते… वसंतातल्या कोवळ्या पालवीची जागा आता हिरव्यागार पानांनी घेतली होती… निसर्गाने अजून एकदा रूप पालटले होते…
ट्रेकची अशी झकास सुरवात झाली होती…
रानशील घाटाची वाट तशी अगदी मळलेली आहे. सुरवातीला तर अगदी बांधीव वाट आहे. आजूबाजूच्या हिरव्यागार जंगलातून तांबड्या मातीची ती ठळक दिसणारी पायवाट केसाच्या मधोमध पाडलेल्या छान भांगासारखी वाटत होती. त्यात पावसाने त्या मातीचा तांबडेपणा अजूनच उठून दिसत होता. चालताना मध्येच लागणारा एखादा खडा चढ, खळाळत्या पाण्यातून गेलेली वाट, मध्येच येणारी पावसाची मोठी सर… वाटेत लागणाऱ्या धबधब्यांमध्ये यथेच्छ भिजणे यात तीन तास कसे गेले हे कळलेच नाही.
याआधी निदान सात-आठ वेळा तरी माझा भीमाशंकर ट्रेक झाला होता. पूर्वी पावसाळ्यातील लोणावळा -भीमाशंकर ट्रेक ही चक्रमची खासियतच होती. साहजिकच चालता- चालता भीमाशंकर परिसरात केलेल्या भटकंतीच्या जुन्या आठवणी जाग्या होत होत्या.
वाटाड्यालाही लाजवेल असे दिशाज्ञान असणारा आणि ज्याच्या उत्साहाच्या जोरावरच आम्ही २००० सालच्या सप्टेंबर महिन्यात वन डे लो -भी करायचे ठरवले तो मंगेश आठवत होता..
सतरा तास सलग चालत वन डे लो -भी करून भिमाशंकराला पोचल्यावर देवळाच्या समोरच्या धर्मशाळेत आडवे झाल्यावर उठावेसेच वाटत नव्हते हे आठवलं…
पवारांकडे जेवल्यावर सुदाम पवारांनी “उद्या उतरून जाणार का?” असं विचारल्यावर उद्या उठलो तर गाडीने पुण्याला जाणार हे शारंगने दिलेलं उत्तर आठवलं…
कुसूर पठारावर लीलया वाट शोधणारा नरेंद्र तांबे आठवला…
चार दिवसांच्या लोणावळा-भीमाशंकर- साखरमाची -उचले ट्रेकला उडालेली तारांबळ आणि झालेले हाल आठवले… भीमाशंकराच्या देवळाबाहेर १९९२ साली बघितलेला पाण्याचा भीतीदायक प्रवाह आठवला…
पाठीवर मोठ्या आणि वजनदार सॅक घेऊन केलेली दिवसाची दहा-बारा तासाची चाल आठवली
दिवसभर भिजून खांडी किंवा सावळे गावात बनवलेला स्वयंपाक आठवला…
भीमाशंकर आता अगदी टप्प्यात आलं होतं. भीमाशंकर जंगलाचे वैशिष्ट्य असलेले उंचच उंच वृक्ष, त्याला लगडलेल्या वेली वातावरण अजूनच नोस्टॅल्जिक करत होते … चालता चालता अचानक शारंग जरा थांबला आणि म्हणाला,” MB हे सर्व पाहिलं, आठवलं की बा. भ. बोरकरांच्या कवितेच्या ओळी आठवतात. ‘ आयष्याची आता झाली उजवण, येतो तो तो क्षण अमृताचा’
शारंग एकदमच भावूक झाल्यासारखा वाटला. तो सांगत होता की आता ट्रेकला असेच वाटते.. कुठलाही हँगओव्हर न ठेवता निसर्गाचा आनंद लुटावा… प्रत्येक क्षण साजरा करावा…
कृतार्थ आणि सफल आयुष्य जगलेली एक व्यक्ती उत्तरार्धात प्रत्येक क्षण आनंदाने जगते आहे अशी त्या ओळींच्या मूळ कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. साहजिकच त्या ओळींमध्ये एका भैरवीची आर्तता होती. पण शारंगने त्या ओळींचा एक वेगळाच अर्थ त्या क्षणी उलगडून दाखवला. शारंगने सांगितलेल्या त्या दोन ओळी पुढे ट्रेकभर माझ्या मनात घोळत होत्या…
त्या ओळी डोक्यात घोळवत असतानाच भीमाशंकर देवळाचा नागरी परिसर जवळ आल्याची चाहूल लागली – पण ती सुखद निश्चितच नव्हती. वाहत्या पाण्याला येणारी दुर्गंधी, सर्वत्र दिसणारे प्लास्टिकचे ढीग बघून इतक्या वेळ स्वर्गवत वातावरणात वावरणारे आम्ही क्षणात जमीनीवर आलो.
रविवार असल्याने देव दर्शनाला प्रचंड गर्दी होती. प्रत्यक्ष गाभाऱ्यात जाऊन महादेवाचे दर्शन घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण कळस दर्शन तरी करता येईल का याचा आम्ही विचार करत होतो. शेवटी हो – ना करता करता आम्ही नुसतं देवळाजवळ जाऊन यायचं ठरवलं.
त्या दिवशी आषाढी एकादशी होती… विष्णुस्वरूप विठ्ठलदर्शनाला पंढरपूराला नाही तरी देवाधिदेव महादेवाच्या एका ज्योतिर्लिंगाला जायचे पुण्य पदरात पडले होतेच … ‘सर्व देव नमस्कारं केशवं प्रति गच्छति’ हा संस्कृत श्लोक आठवला आणि मनाचं समाधान झालं …
देऊळ दर्शन करून परत आलो आणि जेवण्यासाठी म्हणून एका हनुमानाच्या देवळाशी आलो. ते देऊळ बघताच मंगेश पंडीतला सह्यांकन-२०१३ मोहिमेतली शेवटची छावणी आठवली. मी आणि मंगेश त्यावेळी पायलट आणि सह्यांकन अशा दोन्ही वेळा तिकडे येऊन गेलो होतो…
जेवून थोड्यावेळ विश्रांती घेतली आणि घोगोळ घाट मार्गे परत जायला निघालो तेव्हा दुपारचे सव्वा दोन वाजून गेले होते. गणेश घाटामार्गेच आम्ही सुरवातीला उतरणार होतो. भीमाशंकराची ही बाजू मात्र फारच स्वच्छ होती. या विरोधाभासाबद्दल सोबतच्या वाटाडयाला विचारले तेव्हा तो म्हणाला की या बाजूची देखभाल करणारा वनखात्याचा वेगळा विभाग आहे आणि सकाळी आलो त्या बाजूसाठी वेगळा विभाग आहे. एकाच खात्याच्या, एकमेकांपासून काहीशे फूट अंतरावर काम करणाऱ्या दोन विभागांच्या कार्यशैलीत एवढा फरक कसा असू शकतो हे कोडे काही मला उलगडले नाही.
गणेश घाटाने सुमारे दोन तास उतरून झाल्यावर एक बऱ्यापैकी सपाटी लागली. इथून पुढे घोगोळ घाट आणि गणेश घाटाच्या वाटा वेगळ्या होत होत्या. गणेश घाट डावीकडे तर घोगोळ घाट उजवीकडून काठेवाडीकडे. आमच्या वाटाड्याने पुन्हा एकदा आम्हाला गणेश घाटाने जायच्या पर्यायाचा विचार करायला सांगितले. ‘प्रयत्न तर करून बघायला काय हरकत आहे?” असं त्याला सांगून आम्ही पुढे निघालो.
लगेचच घोगोळ घाटाची ती बहुप्रतिक्षित वाट सुरु झाली. वाट तशी तीव्र उताराची आणि नागमोडी वळण घेत ओढ्यातून जात होती. आजूबाजूला दाट जंगल होते. त्यामुळे मध्येच वेली आडव्या येत होत्या, पायाखालचे दगड नुसतेच निसरडे नव्हते तर ते पायाखालून सुटतही होते. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकायला लागत होतं. वाटेबद्दल राजश्रीला वाटलेली काळजी आणि वाटाड्याचा गणेश घाटाने जायचा आग्रह मी आता समजू शकत होतो. मध्येच एका ठिकाणी रस्ता अचानक बंद झाल्यासारखं वाटलं. पण थोडी शोधाशोध आणि राजश्रीकडे असलेला GPX ट्रॅक त्यावेळी उपयोगी आला आणि आम्ही योग्य वाटेल लागलो. ट्रेकमधील सगळेच सोबती तसे अनुभवी आणि समजूतदार असल्याने कुणी काही घाई गडबड करत नव्हतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही त्या कठीण टप्प्यात सेल्फी काढण्याची जोखीम घेऊ नका हे सांगायची वेळ आली नाही. आम्ही तो टप्पा अगदी सावकाश गतीने उतरलो. कदाचित त्या गतीमुळेही त्या वाटेल घोगोळ घाट म्हणत असावेत असं मनाला उगीचच वाटून गेलं. सुमारे दीड तासाने आम्ही तो घाट उतरून सपाटीला लागलो…
हिरव्यागार गवताने जणू तिथल्या सगळ्या जमिनीवर गालिचा अंथरला आहे असं वाटत होतं. सगळेच मागे वळून पाहत होते… आपण आलेली वाट, आता बंद झालेली पण आधी कितीतरी वेळा ज्या वाटेचा थरार अनुभवाला ती शिडीची वाट, ढग बाजूला झाल्यावर अचानक दर्शन देणारा पदरगड, भीमाशंकराचं पठार असं डोळ्याचं पारणं फेडणारं ते दृश्य होतं.
एक झक्कास ट्रेक सुरळीत पार पडला होता. भीमाशंकराकडे जाणाऱ्या दोन नवीन घाटवाटांची ओळख झाली.
घरी परत यायला निघालो तेव्हा सकाळी शारंगने सांगितलेल्या बा. भ. बोरकरांच्या ओळीच सारख्या आठवत होत्या … आयुष्याची आता झाली उजवण, येतो तो तो क्षण अमृताचा…
महेश भालेराव
१७ जुलै २०२५
ता. क. या पोस्टसोबत टाकलेल्यापैकी एकही फोटो किंवा व्हिडीओ मी काढलेला नाही. प्रवीण जाधव, मंगेश पंडीत, हृषीकेश आठवले, समीर सागवेकर अशा विविध सहकाऱ्यांनी ते फोटो काढले आहेत. त्या सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद!!!
Tags:bhimashankar trek
Recent Posts
Chakram Hikers0 Comments
चक्रम
Chakram Hikers0 Comments
दसरा पूजा @ चक्रम हायकर्स, मुलुंड ऑफिस
Chakram Hikers0 Comments
पेठ-काऊल्याची-धार-नाखिंदा-भोगदा-पढरवाडी-नाखिंदा घाट-आंबिवली
Tags
ambivali trek
bhimashankar trek
bhivgad fort trek
dasra puja 2025
dhak fort trek
fort sarasgad
fort surgad
galdevi ghat
ganichi vaat
kaulyachi dhar
kothaligad trek
kurvande trek
nakhinda ghat
panhalgad to vishalgad trek
panhalgad trek
pavankhid trek
savardand
surgad to sarasgad trek
takmak trek
umbarkhind trek