चक्रम

१९८२ साली काही तरुणांच्या सायकली चोरीला गेल्या . भटकंतीचे वेड लागलेल्या त्या तरूणांना नविन सायकल घेणे परवडत नव्हते आणि घरात तर बसवत नव्हते. मग करायचं काय? सायकल गेली तर गेली… पाय तर शाबूत होते ना? मग सुरू झाली पायी भटकंती…
या भटकंतीचे रूपांतर कधी गिर्यारोहणाच्या छंदात झाले हे त्या तरुणांनाही कळले नाही. त्यातूनच मग स्थापना झाली चक्रम हायकर्स, मुलुंड या संस्थेची.

जसा छंद, तसेच नांव घेतले- चक्रम.

सरकार- दरबारी नांव नोंदणी करताना तिथले अधिकारीही चक्रावून गेले. चक्रम? हे काय संस्थेचे नांव झाले? पण तेव्हा त्या सरकारी अधिकाऱ्यांना कसं बसं समजावलं आणि संस्थेची नांव-नोंदणी झाली…
१९८३ साली पहिले सह्यांकन पार पाडले. १९८५ साल उजाडले… आता वेध लागले होते ते दुसऱ्या सह्यांकनचे… मार्ग ठरला – तोरणा-राजगड-शिवथर. यावेळेच्या सह्यांकनचे वैशिष्ट्य म्हणजे साक्षात दुर्गमहर्षी गो. नी. दा. एका छावणीवर मुक्कामाला येणार होते. त्यामुळे उत्साहाने सगळे जोरदार तयारीला लागले होते.
पण दुर्दैवाने गो. नी. दा. सह्यांकनला येऊ शकले नाहीत. सगळेच खट्टू झाले. पण नाउमेद मात्र झाले नाहीत. सह्यांकन दणक्यात पार पडले. इतकं की सह्यांकन नंतर लगेचच एक छायाचित्र प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ती १९८६ सालाची सुरवात होती…
या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मात्र गो. नी. दा. आवर्जून आले. मुलुंडमध्ये मुक्कामही केला होता. चक्रमच्या धडपड्या तरुणांनी प्रदर्शनाची व्यवस्था अगदी चोख केली होती. दोन सह्यांकन, दोन वर्षातील विविध गिर्यारोहण कार्यक्रम यांची माहिती गो. नी. दा. नी घेतली आणि त्या धडपड्या तरुणांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
पण… पण… दुर्ग महर्षीनी एक प्रश्न पडला होता. दुर्गभ्रमणासारखे इतके पवित्र आणि उपयोगी कार्य करणाऱ्या या तरुण मुलांनी आपल्या संस्थेचे नांव ‘चक्रम’ असे विचित्र का ठेवले आहे? गो. नी. दा. म्हणाले हे नांव तुम्ही बदलायचा विचार करा आणि छंदाशी सुसंगत नांव ठेवा.
ही सूचना त्या तरुणांना मान्य कशी व्हावी? नावातच तर सारं काही होतं… आता तेही जिद्दीला पेटले. गो. नी. दांना ‘चक्रम’चे माहात्म्य पटवून द्यायचा त्यांनी चंग बांधला. पण हे व्हायचे कसे?
हितचिंतकांची चक्रम मध्ये तेव्हाही कमी नव्हती. संस्थेचे तेव्हाचे लेखापाल चंद्रशेखर वझे तेव्हा मदतीला धावून आले. त्यांच्या जोडीला होते भातखंडे गुरुजी.
हे दोघेही तसे संस्कृतचे उत्तम अभ्यासक. इतके की हौस म्हणून ते त्याकाळी म्हणजे १९८५-८६ सालच्या आसपास संस्कृत नाटक बसवत असत.

हजारो वर्षांची परंपरा असलेली आपली भारतीय संस्कृती, लाखो वर्षांपूर्वी पासून अस्तित्वात असलेले नगाधिराज हिमालय, सह्याद्री, सातपुडा, विंध्य अशा अनेक पर्वत रांगा… त्या पर्वतांच्या शिखरांवर विराजमान असलेल्या अनेक देव देवता, नद्या, तीर्थक्षेत्रे… भारतीय संस्कृती भ्रमंती करणारी निश्चितच होती… मग ती भटकंती कशी करायची हे आपल्या पूर्वजांनी सांगितलं नसेल?
वझे सरांना च आणि म या अक्षरांशी संबंधित भटकंती कशी करावी याचे यथार्थ तत्वज्ञान सांगतील असे दोन संस्कृत श्लोक लगेचच आठवले. आता फक्त ‘क्र’ चा प्रश्न होता. भातखंडे गुरुजींनी एक नवीन श्लोकच रचला आणि तो प्रश्नही चुटकीसरशी सोडवला. आता भ्रमंतीशी संबंधित तीन श्लोक मिळाले.
त्या तीन श्लोकांच्या अंतिम चरणांची आद्याक्षरे घेऊन ‘ चक्रम ‘ शब्द साधला. इतके दिवस एका छंदाचे वेड दर्शवणाऱ्या शब्दात आता भ्रमंतीचे तत्वज्ञानच गुंफले गेले…

भ्रमंती का करावी, कशी करावी, कुठे करावी आणि त्यातून काय साधायचं हे अगदी अचूक शब्दात या तीन श्लोकांमध्ये सांगितले आहे… ते तीन श्लोक आणि त्यांचा अर्थ असा:
‘चक्रम’
चराती चरतो भगः।
क्रमणेन वसुंधरा।
मनःपूतं समाचरेत।
आस्ते भग आसीनस्योर्ध्वस्तिष्ठती तिष्ठत:।
शेते निपद्यमानस्य चराती चरतो भगः।
चरैवेति चरैवेति।।
(ऐतरेय ब्राह्मण ७:३)

अर्थ : जो बसून राहतो त्याचे भाग्यदेखील बसून राहते. जो उभा राहतो त्याचे नशीब उभे राहते. जो झोपून राहतो त्याचे भाग्यदेखील झोपून राहते. जो चालत राहतो (प्रयत्न करतो) त्याचे दैव गतिमान होते, म्हणून चालत रहा.
क्रमणेनार्ज्यते ज्ञानं क्रमणेन महद्धनम्।
क्रमणेनाप्यते पुण्यम क्रमणेन वसुंधरा।।

(रचनाकार- भातखंडे गुरुजी, मुलुंड.)

अर्थ : चालल्याने ज्ञान प्राप्त होते, फिरल्याने पुष्कळ धन मिळते, भ्रमणाने पुण्य लाभते, चालल्याने सर्व पृथ्वीची प्राप्ती होते.
दृष्टीपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलं।
सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत।।

(भागवत – ११:१८:१६)

डोळ्यांनी नीट पाहून मगच पुढचे पाऊल टाकावे, वस्त्राने गाळून शुद्ध झालेले पाणी प्यावे, सत्याने पवित्र झालेली वाणी बोलावी, (सारासार विवेक करून) मनाने शुद्ध असेल असे आचरण करावे.
या संस्कृत श्लोकांनी
‘चक्रम ‘ शब्दाला जणू एक चपखल कोंदण मिळालं. काही दिवसांनी ते तरुण चक्रम गो. नी. दां ना भेटले आणि त्यांना चक्रम शब्द कसा सार्थ आहे हे अभिमानाने सांगितलं. डोंगरात भटकणारी ती तरुण मुलं आपलं म्हणणं इतकं मनावर घेतील आणि भटकंतीचे तत्वज्ञानच आपल्या संस्थेच्या नावाशी निगडीत करून घेतील अशी कल्पना त्या दुर्ग महर्षीनी केली नव्हती. त्यांनी तशी मोकळी कबुली दिली आणि त्यांना भेटायला गेलेल्या चक्रमांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
चक्रमच्या स्थापनेला आता ४२ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. … त्या यशस्वी वाटचालीत या श्लोकांचाही महत्वाचा वाटा आहे… हे श्लोक म्हणजे प्रत्येक चक्रमाच्या मर्म बंधातली ठेव आहे…

महेश भालेराव
२६/०७/२०२५

Add a Comment

Your email address will not be published.