कुरवंडे – उंबरखिंड – सावरदंड

बकेट लिस्ट…

गेली किती तरी वर्षे खोपोली-पाली मार्गे कोकणात जातोय. वाटेत दिसणारे प्रबळगड, सुधागड किल्ले बघायचे राहून गेलेत. तशीच राहून गेली होती ती समरभूमी उंबरखिंड. देवन्हावे गावातून पुढे निघालो की काही अंतरावर डावीकडे समरभूमी उंबरखिंडीकडे जायचा रस्ता दिसतो. तो दिसला की मी स्वतःलाच आठवण करून द्यायचो या समरभूमीला एकदा तरी भेट द्यायची आहे. वास्तविक थोडी वाट वाकडी करत गाडीरस्त्याने तिथे कधीही जाता आले असते. पण कुरवंडे घाट उतरूनच त्या समरभूमीला वंदन करायला जायचे हे कायम मनात होते. मुळात हा ट्रेक मी इतक्या वर्षात का केला नव्हता हे माझं मलाच कळत नव्हतं . पण काही ना काही कारणाने हा ट्रेक झाला नव्हता हे मात्र खरं…
तो योग आला चक्रम हायकर्सच्या जुलै-ऑगस्ट महिन्यातील मोहिमांची कार्यक्रम पत्रिका ठरवताना. यावेळी मात्र उंबरखिंडीचा ट्रेक करायचाच हे मी ठरवलं. हा ट्रेक कुठल्याही ऋतूत करता येतो. पण पावसाळ्यात या ट्रेकचा आनंद आणि थरार काही औरच असतो हे अनेक मित्रांकडून, लोकांच्या समाज माध्यमांवरील लिखाणामधून समजले होते. कुरवंडे घाटाने उतरून पुन्हा तिथूनच वर यायचं असा ट्रेक करायचा आधी विचार होता. पण समर भूमिचे दर्शन घेऊन परत येताना एका वेगळ्या वाटेने म्हणजे सावरदांड मार्गे चढाई करून कुरवंडे गावात परत यायचा चांगला पर्याय राजश्री कामथने सुचवला. आजवर माझ्या न झालेल्या ट्रेकमध्ये आता एकाच दिवसात दोन घाट वाटा करण्याचा योग आला होता. एकावर एक फ्री … मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. १० ऑगस्ट ही ट्रेकची तारीख ठरली …राजश्रीबरोबर नुकताच NIM मधून बेसिक कोर्स केलेला तन्मय कर्वे ट्रेकचा उपनेता म्हणून यायला तयार झाला. राजश्रीने कुरवंडे गावातील चहा- नाश्ता, ट्रेकसाठी गाईड अशी सर्व व्यवस्था केली. तन्मयने सर्व तांत्रिक साहित्य गोळा केले आणि दिवसभर ते बरोबर वाहिलेही.
लोकांचाही या ट्रेकला प्रतिसाद चांगला लाभला. कितीतरी लोकांना नाही म्हणावे लागले. पण पावसाळ्याचे दिवस आणि त्यात समरभूमीकडे जाताना अंबा नदीचे पात्र ओलांडायचे असल्याने मोहीम सदस्य संख्या मर्यादित ठेवली होती…
दहा तारखेला सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही साडे पाच वाजता मुलुंडहुन निघालो… तुर्भ्याजवळ पोचलोच होतो तितक्यात आमच्या गाडीचा टायर फुस्स झाला. आता इतक्या सकाळी टायरचे पंक्चर कोण काढणार या विचाराने गाडीच्या टायरबरोबरच आमचीही हवा निघाली. पण गाडी चालकाने शांतपणे गाडीतून पंक्चर काढायची आयुधे बाहेर काढली आणि त्याला साथ दिली ती विलासपूरहून खास या ट्रेकसाठी उड्डाण करून आलेल्या पिळदार शरीरयष्टीच्या नितीन पाटीलने. पंधरा- वीस मिनिटं खटपट करून त्या दोघांनी टायर बदलून दुसरा टायर बसवला आणि गाडी पुढे निघाली. सुदैवाने त्यानंतर खंडाळा घाटात काहीच ट्राफिक लागले नाही आणि आम्ही कुरवंडे गावात आठ वाजता पोचलो सुद्धा…
कुरवंडे गावात चहा आणि गरमागरम उपमा खाऊन आम्ही उंबरखिंडीकडे चालायला सुरवात केली तेव्हा पावणे नऊ वाजले होते. बसचा टायर पंक्चर होऊनसुद्धा आमचे वेळेच्या बाबतीत फार नुकसान झाले नव्हते.
कुरवंडे घाट उतरायला सुरवात करण्यापूर्वी साधारण अर्धा- पाऊण तासाची सपाटी मारायला लागते. त्यानंतर चावणी गावाच्या सपाटीला पोचेपर्यंतचा कुरवंडे घाटाचा मार्ग दाट जंगलातून जातो. आम्ही चालायला सुरवात केली तेव्हा पावसाचा मागमूसही नव्हता. अधून मधून चक्क ऊनही पडत होते. हवेत खूपच दमटपणा होता. वाराही जणू आमच्यावर रुसला होता…
आजूबाजूची हिरवीगार वनश्री आणि उत्साही सोबती ही मात्र आमची चांगलीच जमेची बाजू होती. दोन्हींच्या संगतीत कुठेही कंटाळवाणे वाटत नव्हते. जंगलातून चालताना वाटेत क्वचित कुठेतरी गुलाबी रंगाची गौराई, तेरडा, पणंद, पेव अशी फुलं दिसत होती. हिरव्यागार जंगलाच्या पार्श्वभूमीवर ती एखाद-दुसऱ्या झाडावर उमललेली फुले फारच उठून दिसत होती. गौरी पूजनाच्या वेळेला गौराई बहरते आणि ते सगळे जंगल गुलाबी होते ही माहिती वाटाड्या अशोकने दिली. ज्या देवीवर अर्पण होण्यासाठी ती फुलं बहरत होती त्या देवीचेच नांव फुलांना दिले होते. ते कळल्याबर आपली संस्कृती निसर्गाला देव मानते हे पुन्हा मनोमन पटले.
वाटेतील शिवकालीन बारव बघत, वाटाड्या अशोककडून आजूबाजूच्या परिसराची, डोंगरांची माहिती घेत आम्ही जेव्हा चावणी गावात पोचलो तेव्हा दुपारचे बारा वाजले होते…. पावसाच्या धारांमध्ये मनसोक्त भिजायला आलेलो आम्ही घामाच्या धारांनी नखशिखांत भिजलो होतो.
आता पुढचे लक्ष्य होते ते समरभूमी स्मारक … चावणी गांव ते स्मारक हे जवळपास दोन कि.मी. अंतर डांबरी रस्त्याने जायचे होते. त्या दमट हवेत डांबरी रस्त्यावरून चालणे सगळ्यांच्याच जीवावर आले होते. पण कुणीही कुरकुर केली नाही.
समरभूमी स्मारक दर्शनाला जाताना अंबा नदी ओलांडावी लागते. नदीचे पात्रही बऱ्यापैकी रुंद आहे आणि नदी फारशी खोल नसली तरी त्याच कारणाने तिथे प्रवाहाला वेग जास्त असतो. अर्थात गेले काही दिवस फार पाऊस पडत नसल्याने आम्हाला नदी ओलांडून समरभूमी स्मारकाचे दर्शन घेताना फार कष्ट पडले नाहीत. एका अर्थाने पाऊस नसणे आमच्या पथ्यावरच पडले होते. आम्ही समरभूमीचे दर्शन घेतच होतो तितक्यात पाऊस सुरु झाला. त्या जलधारा सगळ्यांनाच सुखावून गेल्या. चार तास घामाघूम होत ट्रेक केल्याचे जणू काही पाऊस आम्हाला बक्षिसच देत होता…
पण आता एक नवीनच प्रश्न उभा राहिला. चार तास तंगडतोड करून सगळ्यांनाच भूका लागल्या होत्या. पण पावसात जेवायचे कसे? भुकेल्या पोटी पुन्हा अर्धा-पाऊण तास चालायची कोणाचीच इच्छा नव्हती. पण पावसाने पुन्हा एकदा बक्षीस दिले… आमचे जेवण व्हावे म्हणून चक्क पाऊस थांबला. सगळ्यांनी बरोबर आणलेले तहानलाडू आणि भूकलाडू खाऊन घेतले, थोडीशी विश्रांतीही घेतली.
समरभूमीतून निघण्यापूर्वी हेमंत पोखरणकर सगळ्यांना उंबरखिंडीतील त्या सुप्रसिद्ध लढाईचे वर्णन करून सांगेल हे आधीच ठरले होते. जेवण झाल्यावर सगळेच ताजे तवाने झाले होते. तेव्हा हेमंतने त्या लढाईचे वर्णन करायला सुरवात केली…
तारीख, महिना, वर्ष, प्रसंग, त्यातील व्यक्ती असे सगळे तपशील पाठ असणारा हेमंत त्या लढाईचा इतिहास उलगडून दाखवत होता आणि सर्वजण तल्लीन होऊन ऐकत होते… उंबरखिंडीच्या लढाईपूर्वी आदिलशहाने पाठवलेला सिद्दी जोहर आणि मोगलांनी पाठवलेला शाहिस्ते खान यांनी एकाच वेळी स्वराज्यावर केलेल्या आक्रमणामुळे स्वराज्य कोष चांगलाच रिकामा झाला होता. त्यात भर पडणे आवश्यक होते आणि अशावेळी शाहिस्तेखानाबरोबर आलेल्या कारतलब खानाची कोकण स्वारी शिवरायांच्या पथ्यावर पडली. २०००० सैन्य, सोबत भरपूर खजिना आणि रसद घेऊन निघालेल्या कारतलब खानाला शिवरायांनी कुरवंडे घाट उतरून अंबा नदीच्या खोऱ्यातील जंगलात येऊ दिले. त्यानंतर तिथल्या जंगलात आधीच दबा धरून बसलेल्या केवळ हजारभर मावळ्यांनी आपल्या पेक्षा वीस पटीने जास्त असलेल्या मोगली सेनेची कशी दाणादाण उडवली याचे अत्यंत रसाळ वर्णन हेमंतने केले. त्यात कुठेही अनावश्यक आवेश किंवा आक्रस्ताळेपणा नव्हता. होते ते अचूक संदर्भ, भौगोलिक माहिती आणि सुयोग्य विश्लेषण. हेमंतने त्या लढाईचे केलेले वर्णन सगळ्यांनाच आवडून गेले. त्या समर भूमीला साक्षी ठेवून हा इतिहास ऐकताना काही काळ सगळ्यांना आपण शिवकाळात आहोत असेच वाटले. हेमंतच्या व्यक्तिमत्त्वात दडलेला एक इतिहासाचा अभ्यासकही यानिमित्ताने आम्हाला पाहायला मिळाला.
याच लढाईचे वर्णन करताना हेमंतने एक महत्त्वाची माहिती सांगितली ती म्हणजे कारतलब खानाचा पराभव करून त्याचा खजिना मिळवल्यावर शिवरायांनी ती लढाई जास्त लांबवली नाही. लढाईमागे जो हेतू होता तो साध्य झाल्यावर शिवरायांनी कारतलब खानासह त्याच्या सर्व सैन्याला अभय देऊन सोडून दिले. वास्तविक अडचणीत सापडलेल्या त्या सैन्याची शिवराय सहज लांडगेतोड करू शकत होते. पण शिवरायांनी तसे केले नाही. कारण त्या लढाईचा काय आवाका असावा आणि त्यातून काय साध्य करायचे हे शिवरायांच्या मनात अगदी निश्चित होते. अफाट दूरदृष्टी आणि सामरिक कौशल्य असलेल्या शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत कधीच आपले नुकसान होणाऱ्या लढाया लढल्या नाहीत. हेमंतने दिलेली ही माहिती ऐकताना डोळ्यासमोर त्याच दिवशी आलेली एक बातमी आली. ऑपरेशन सिंदूर पुढे का चालू ठेवले नाही असं विचारलं असता भारताचे हवाईदल प्रमुख स्पष्टपणे म्हणाले की बलाढ्य राष्ट्र केवळ लढाई करायची म्हणून करत नाहीत, आम्हाला जे साध्य करायचे होते ते साध्य केल्यावर लढाई चालू ठेवण्यात आम्हाला स्वारस्य नव्हते. शिवरायांची कारतलब खानाला सोडून देण्यातली भूमिका आणि आपल्या वायुदल प्रमुखांची भूमिका यात विलक्षण साम्य होते. शिवरायांचा गनिमी कावा आणि त्यांचे युद्धकौशल्य जगभरात अभ्यासाचा विषय का आहेत ते त्या क्षणी पुन्हा एकदा कळलं …
अशा भारलेल्या वातावरणातून काहीशा अनिच्छेनेच आम्ही उंबरखिंडीतुन परत निघालो. पुन्हा चावणी गावात येऊन मग सावर दांडाच्या वाटेला लागलो. एव्हाना तीन वाजून गेले होते. आता खडी चढाई सुरु होणार होती. आभाळही चांगलेच दाटून आले होते. एवढ्या वेळ सतत दर्शन देणारा ड्युक्स नोज आता ढगाआड दिसेनासा झाला होता. सावरदांडाचा खडा चढ आणि जोरदार पाऊस एकदमच सुरु झाले. त्या पावसाने हवेत चांगलाच गारवा आणला. दिवसभर उकाड्याने हैराण झाल्यावर ती जोरदार सर सगळ्यांनाच उत्साहीत करून गेली. पावलं झटझट पडू लागली. उत्साहाने त्या दांडाची झपाझप उंची गाठत असताना मध्येच एक नवीन अडचण आली – ती म्हणजे प्रचंड डास. इतके की बोलायला तोंड उघडलं तर तोंडातही डास जात होते. पण एका अर्थी त्या डासांचा त्रासही पथ्यावरच पडला. झपाझप उंची गाठताना दमून पावलं हळू हळू पडू लागली असती ती आता डासांपासून सुटका व्हावी म्हणून जास्तच वेगाने पडू लागली आणि आम्ही तासाभरात संपूर्ण सावरदांड चढून सपाटीला लागलो. आता कुरवंडे गाव तासाभरावर होते. सपाटीवर छान हवा सुटली होती. सकाळचा थकवा आता कुठल्या कुठे निघून गेला होता.
रमत गमत आम्ही कुरवंडे गावात पोचलो तेव्हा गरमागरम बटाटा भजी, कांदाभाजी आणि मिरची भजी आमची वाटच बघत होती.
पण दुपारी इतिहासकार झालेला हेमंत संध्याकाळी फिटनेस गुरु झाला. दिवसभर चढ -उतार करून दमलेले हातपाय आखडू नयेत म्हणून त्याने सगळ्यांकडून थोडं स्ट्रेचिंग करून घेतलं. समोर असलेली गरमागरम भजी खायचं सोडून स्ट्रेचिंग करायचं म्हटल्यावर मनावरच जास्त ताण आल्यासारखे वाटलं. पण हेमंतने सगळ्यांची लवकरच सुटका केली.
गरमागरम भजी खाऊन आणि छान चवीचा चहा पिऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला… दिवसभराच्या भारलेल्या वातावरणातून नेहमीच्या शहरी वातावरणाकडे…
इतके दिवस बघायची राहून गेलेली समरभूमी उंबर खिंड आज बघून झाली… आता वाट पाहतो आहे ती प्रबळगड आणि सुधागड कधी होताहेत याची…

महेश भालेराव
१२ ऑगस्ट, २०२५.
ता. क.: या पोस्टसोबत जोडलेले सर्व फोटो माझे ट्रेकमधील सोबती हृषीकेश आठवले, परीन शहा, अथर्व जोशी, डॉ. सुनील कवडे आणि हेमंत पोखरणकर यांच्या सौजन्याने.

Add a Comment

Your email address will not be published.