पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगड-माचाळ व माचाळच्या घाटवाटा’
** ०२ ते ५ ऑक्टो २०२५ **
चक्रम हायकर्स आयोजित ‘पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगड-माचाळ व माचाळच्या घाटवाटा
सर्वपरिचित पन्हाळगड-विशाळगड हा ट्रेक तर शेकडो लोकं करतातच. पण तेवढच करून परत यायचं असेल तर मग चक्रमच कशाला हवं ना.. म्हणूनच लोकांमध्ये फारसं परिचित नसलेले परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील विकसित होऊ घातलेले थंड हवेचे पर्यटनस्थळ ‘माचाळ’ ला जाऊन कोकणात उतरणाऱ्या ३-४ घाटवाटा करण्याचा घाट चक्रमने घातला. नियोजित नेता महेश भालेराव उर्फ MB ला यायला जमणार नव्हते म्हणून राजश्री कामथ बरोबर ट्रेकचे नेतृत्त्व करण्याचाही योग जुळून आला.
लांबचा पल्ला गाठायचा म्हणून ०१ ऑक्टो रात्री ९-३० च्या सुमारास मुलुंडहून प्रयाण केले. पुण्यात तिघा जणांना पिक-अप केल्यावर आमचा नऊ जणांचा चमू पहाटे साडेपाचलाच पन्हाळगडावर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळी पोहोचला. सुमारे तीस वर्षांपूर्वी केलेला पन्हाळा-विशाळ ट्रेक आणि नंतर काही वर्षांनी पर्यटक म्हणून घेतलेले पन्हाळा दर्शन अशा आठवणी काढत गड बघायला सुरुवात केली. छत्रपती महाराजांच्या पन्हाळ्यावरील सुंदर वास्तू मधे गेल्या तेरा पिढ्या नगारजी म्हणून काम करणाऱ्या नगरकर कुटुंबीयांपैकी जेष्ठ हनीफ नगरकर यांच्याशी आम्ही आधीच संपर्क साधला होता. सकाळचा फक्कड चहाचे आदरातिथ्य श्री हनीफ यांच्याबरोबर महालात करून आम्ही गडदर्शनाला निघालो. स्वत: वयस्कर असूनही हनीफ यांनी आम्हाला नगारा वाजवून दाखवला. आमच्या बरोबर माहिती देण्यासाठी त्यांचा नातू आदिम दिमतीला होता. इंजिनीरिंगचे शिक्षण, पुरातत्वशास्त्राचा सखोल अभ्यास, मराठी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्त्व असलेल्या उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या आदिम बरोबर गाद बघताना बऱ्याच गोष्टींची जाण झाली. आमच्या कडे वेळ अतिशय कमी असल्यामुळे शिवा काशीद आणि बाजीप्रभूंचे स्मारक, तीन दरवाजा, धान्यकोठार, ई. मोजक्याच वास्तू बघून आम्ही पावनखिंडीच्या ऐतिहासिक मार्गावर रवाना झालो.
लांबलेल्या पावसामुळे वाटेतील म्हसई पठार म्हणजे निसर्गाचे नंदनवन झाले होते. बघावं तिथे हिरवी मखमली शाल आणि त्यावर असंख्य फुलांची झालर. त्यातच दोन ऑक्टो चा दिवस म्हणजे दसरा. म्हसई पठारावरील म्हसई देवीच्या मंदिरात या दिवशी जत्रा असते. पंचक्रोशीतली अनेक कुटुंबं परीटघडीचे कपडे-दागिने घालून दसऱ्याला देवीच्या दर्शनाला आली होती. अशा जत्रेच्या वातावरणात स्वच्छता, आरोग्य अशा शहरी गोष्टींकडे घटकाभर दुर्लक्ष करत तिथे मिळणाऱ्या कुल्फीचा आस्वाद घेत आम्ही पुढे कर्पेवाडीकडे निघालो.
वाटेत कुंभारवाडी येथे जेवण झाले. गेले चाळीस वर्ष एकत्र गिर्यारोहण करत असलेला माझा वर्गमित्र शारंग थोरात याचा वाढदिवस केक कापून साजरा केला. संध्याकाळी ६:३० च्या सुमारास मुक्कामी कर्पेवाडी येथे पोहोचलो. मुक्काम, जेवण इत्यादी व्यवस्था प्रकाश काथले या अतिशय उत्साही व्यक्तिवर सोपवली होती. रात्रीच्या भोजनापासून ते दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंतची चोख व्यवस्था प्रकाशने ठेवली होती.
०३ ऑक्टो ला सकाळी लवकरच पावनखिंडीकडे निघालो. जंगलातून तंगडतोड करत दुपारी साधारण १ च्या सुमारास पांढरपाणी गाव गाठले. तिथून पुढे पावनखिंड आणि विशाळगडापर्यंत टार रोड असल्यामुळे तो प्रवास बसने करायचा ठरवलं होतं. महाराजांनी तेव्हाच्या काळात भर पावसात अंधारात सतत बावीस तासात हा मार्ग कसा पार पाडला असेल, बाजीप्रभूंनी पावनखिंडीत केलेले बलिदान इत्यादी ऐतिहासिक प्रसंगाचे आपापल्या मति प्रमाणे अंदाज लावत गप्पांच्या ओघात आम्ही विशाळगडावर पोहोचलो.
विशाळगडावर फिरताना गेल्यावर्षी झालेल्या सांप्रदायिक दंगलीची चाहूल जागोजागी लागत होती. बाजींच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे माचाळ कडे निघालो.
विशाळगडावरच आमचा माचाळचा रहिवासी असलेला संतोष पाटील हा हुरहुन्नरी वाटाड्या येऊन थांबलेला होता. त्यामुळे पुढची वाट शोधण्याची चिंता मिटली. विशाळगडाच्या कोकण दरवाज्यातून माचाळला जाणारी वाट अतिशय सुंदर आहे, आजूबाजूचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवत आम्ही तिन्हीसांजा माचाळच्या पठारावर पोहोचलो. तिथे नथुराम भाताडे यांच्याकडे राहायची आणि जेवणाची व्यवस्था केली होती.
विशाळगडावरच आमचा माचाळचा रहिवासी असलेला संतोष पाटील हा हुरहुन्नरी वाटाड्या येऊन थांबलेला होता. त्यामुळे पुढची वाट शोधण्याची चिंता मिटली. विशाळगडाच्या कोकण दरवाज्यातून माचाळला जाणारी वाट अतिशय सुंदर आहे, आजूबाजूचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवत आम्ही तिन्हीसांजा माचाळच्या पठारावर पोहोचलो. तिथे नथुराम भाताडे यांच्याकडे राहायची आणि जेवणाची व्यवस्था केली होती.
हे माचाळ गाव खरं तर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे पण फोनच्या नेटवर्कची मात्र बोंब आहे. या नाथूरामशी संपर्क साधायचा तर गावातला एक रुपेश गोवळकर नावाचा omni चालक आहे, त्याला संपर्क करायचा आणि मग तो मेसेज द्यायचा. एकंदरीत या रुपेशची आम्हाला ट्रेकच्या आधी खूपच मदत झाली.
४ तारखेला पहाटे उठून आम्ही बसने कोकणात उतरून एका ‘खोर्नींको’ असं मराठी मुलुखात जरा वेगळचं नाव असलेल्या गावात पोहोचलो. इथे मोठे धरण व जलाशय शुद्ध आहे. स्थानिक लोकांच्या माहिती प्रमाणे ‘निंको’ नावाच्या देवीवरून या खोऱ्याला आणि पर्यायाने या गावाला ‘खोर्नींको’ असं नाव पडलंय. ‘खोर्नींको’ वरून माचाळला चढणारी वाट वापरातली नव्हती त्यामुळे मधे मधे झाडी छाटत मार्गक्रमणा होत होती. घनदाट जंगल, खाडी चढाई आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा . मी केलेल्या घाटवाटांतील एक अतिशय सुंदर वाट. साधारण ५ तास चढाई करून आम्ही माचाळला पोहोचलो. दुपारी लगेच पाळू या गावात उतरणाऱ्या घाटवाटेने ट्रेक सुरु केला. वाटेत एक बिशाचा कडा नावाचे ठिकाण लागते. माचाळवासियांना फोनची रेंज इथेच येते. पाळुची घाटवाट पण छान होती. संध्याकाळी तिथे पोहोचलो आणि बसने मुक्कामी परत माचाळला हजर.
५ तारखेला सकाळी उजाडताच मुचकुंद शिखराकडे चालायला सुरुवात केली. तासाभरात मुचकुंदच्या मंदिरात पोहोचलो. खाली उतरलेले ढग, थेट साखरपा पर्यंतचा कोकणातला परिसर.. निघावेसे वाटत नव्हते. परंतु सर्वत्र असलेल्या जळवांचा वावर आम्हाला एक मिनिटही एका जागी उभा राहू देत नव्हता. चक्रमने १९८३ साली केलेल्या पहिल्या सह्यांकनला मुचकुंद वरून कोकणातल्या साखरपा गावात उतरायचे, परंतु ती वाट आता वहिवाटीच्या राहिली नसल्याची माहिती वाटाड्याने दिली. परत माचाळ ला येताना माचाळची अतिशय सुंदर देवराई आणि देवराईतील मंदिर बघायला मिळाले. कधीही माचाळला गेलात तर आवर्जून बघावे असं ठिकाण.
नाश्त्यानंतर ट्रेकची शेवटची घाटवाट म्हणजे माचाळहून कोकणातल्या भोवडे गावात उतरणारी वाट करायला सुरुवात केली. या वाटेला ग्रामस्थ ‘तीपौना’ ची घाटवाट सुद्धा म्हणतात. सुमारे तीन तासांच्या तीव्र उतारा नंतर आम्ही भोवडे गावात आमच्या दसऱ्याच्या सीमोल्लंघनाच्या ट्रेकची सांगता केली. आणि पुणे मार्गे रात्री बारा वाजता मुलुंडला पोहोचलो.
पूर्ण ट्रेक लक्षात राहिला तो या परिसरात लागलेल्या जळवांमुळे तसेच मनमिळाऊ आणि सतत बिनतक्रार चालत राहणाऱ्या सहकाऱ्यांमुळे. ट्रेकच्या प्लॅनिंगला राजश्रीला माचाळ मधे भटकंती केलेल्या मधुकर धुरीची नक्कीच मदत झाली. MB ने स्वतः न येऊनही गाववाल्यांशी केलेले बोलणे आणि प्लँनिंग याचा उल्लेख न करता या पोस्टचा शेवट होऊच शकत नाही!
गेले ९-१० वीकेंड न चुकता ट्रेक करतोय आता पुढील दोन महिने बहुदा रजा घेतोय,,,,!
Recent Posts
Chakram Hikers0 Comments
चक्रम
Chakram Hikers0 Comments
दसरा पूजा @ चक्रम हायकर्स, मुलुंड ऑफिस
Chakram Hikers0 Comments
पेठ-काऊल्याची-धार-नाखिंदा-भोगदा-पढरवाडी-नाखिंदा घाट-आंबिवली
Tags
ambivali trek
bhimashankar trek
bhivgad fort trek
dasra puja 2025
dhak fort trek
fort sarasgad
fort surgad
galdevi ghat
ganichi vaat
kaulyachi dhar
kothaligad trek
kurvande trek
nakhinda ghat
panhalgad to vishalgad trek
panhalgad trek
pavankhid trek
savardand
surgad to sarasgad trek
takmak trek
umbarkhind trek