पेठ-काऊल्याची-धार-नाखिंदा-भोगदा-पढरवाडी-नाखिंदा घाट-आंबिवली
दि. २७ आणि २८ सप्टेंबर २०२५
चक्रम हायकर्स आयोजित असाच एक जरा वेगळा ट्रेक. MB ला कार्यबाहुल्यामुळे यायला जमणार नव्हते म्हणून राजश्री कामथ बरोबर उपनेता म्हणून जायचे ठरवले.
मन सहजच भूतकाळात कधी घेऊन गेले ते कळलेच नाही.
ट्रेक मधला पहिला किल्ला सर्वपरिचित कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला होता. योगायोगाने चक्रम मधे माझा ‘नेता’ म्हणून केलेला पहिला ट्रेक सुद्धा कोथळीगडच होता- मी अकरावीत असताना, १९८९ साली म्हणजे साधारण फक्त ३५ वर्षापूर्वी!! त्यावेळच्या संस्थेतील माधव फडके सारख्या जेष्ठ मंडळीनी केलेले मार्गदर्शन अजूनही आठवते आहे. त्याआधी शाळेत असताना कै पुंडेकाका, माधवदादा कर्वे आणि कै गौरी वहिनी यांच्या बरोबर आम्हा समवयस्क मित्रमंडळीना घेऊन केलेला पेठ अजूनही जशाचा तसा आठवत आहे. परंतु पेठ चे व्यावसायीकरण झाल्यानंतर गेल्या किमान पंचवीस वर्षात पेठ ला जाण्याचा योग आला नव्हता. असो. भूतकाळात रमणे नको…
तर शनिवारी पहाटे पहिल्या कर्जत गाडीने आम्ही कर्जत गाठले (अनेक वर्षांनी ट्रेन ने प्रवास). तिथून आंबिवली गावात पोहोचलो. हवामान खात्याने रेड अलर्ट दिला होता त्यामुळे पाऊस झोडपणार असे वाटतच होते. एक दीड तासात पेठवाडीत पोहोचलो. थोडे थांबून पेठच्या सुळक्याच्या पोटातील गुहेत पोहोचलो. गुहा मात्र पूर्वी होती तशीच.. आणि मुख्य म्हणजे पर्यटकांचा एवढा ओघ असूनही अतिशय उत्तम स्वछता ठेवण्यात आली होती. सुळक्याच्या पोटातल्या पायऱ्या चढून माथा गाठला आणि लगेच खाली उतरलो.
पेठवाडीत जेवून लगेच काऊल्याची धार नावाच्या डोंगर धारेवरून चढायला सुरुवात केली. काऊल्याची धार आम्हाला पेठवाडीतून नाखिंदा भोगदा येथे घेऊन जाणार होती. दोन्ही बाजूला दरी, फारशी वहिवाट नसल्यामुळे गवतामध्ये झाकलेली चिंचोळी पाऊलवाट, निसरडा मुरूम आणि निसरडे दगड याच्यातून आरोहण करत आम्ही नाखिंदा माथ्यावर पोहोचलो. तिथून पुढे नाखिंदा भोगदा (नेढं) बघून आम्ही पुढील मार्गक्रमणा सुरु केली. आमचा नियोजित मुक्काम होता लोणावळा-भीमाशंकर ट्रेकच्या मार्गावरील वांदरे गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या ‘पढरवाडी’ या गावात. (पदरगडाच्या पायथ्याचे पदरवाडी गाव वेगळे बरं का). अख्खा दिवस जणू काही आम्ही हिमालयातलं Whiteout अनुभवतो आहे अशा गडद धुक्याच्या पडद्यातून आमची वाटचाल झाली होती, अपेक्षित पाऊस मात्र नव्हता.
पढरवाडीत रात्रीचे जेवण झाल्यावर IMD ने दिलेल्या रेड अलर्ट ची अनुभूती यायला लागली. अभूतपूर्व पाऊस सुरु झाला, रात्रभर ढगफुटीसारखा पाऊस कोसळत होता. रात्रभर पावसाच्या भयप्रद आवाजाने झोपेचे खोबरे झाले आणि तेव्हाच मनात आले की दुसऱ्या दिवशी भीमाशंकरला जायचा नियोजित प्लॅन शंभर टक्के बदलावा लागणार. भीमाशंकरला पोहोचायच्या आधी पावसाळ्यात महाकाय रूप धारण करू शकणारा एक ओढा क्रॉस करावा लागतो. १९९२ साली चक्रमच्या ट्रेकला रात्री ९ च्या सुमारास अशाच पावसात मी, माधवदादा कर्वे आणि विलास जोशी यांनी अनुभवलेले दिव्या डोळ्यासमोरून तरळून गेले.
पहाटे उठल्यावर राजश्री, मी आणि अरुणने एकमताने भीमाशंकरला न जाण्याचा निर्णय घेतला. आता परतीचा मार्ग नाखिंदा घाट (पायऱ्याची वाट- पायऱ्याच्या झाडांवरून हे नाव पडलंय nothing to do with steps) मार्गे हळू हळू उतरायला सुरुवात केली. पाऊस कोसळतच होता. आदल्या दिवशी गावाजवळचा सहज ओलांडलेल्या ओढ्याला आता नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. साखळी पद्धतीने सगळ्यांनी ओढा व्यवस्थित पार केला. उतरताना पायवाटेवरून खळाखळा पाणी वाहत होते. शेवटी पेठवाडी गावाच्या थोडे आधी असलेल्या अशाच एका खवळलेल्या ओढ्याने वाट अडवली. पात्र फार रुंद नव्हते परंतु मी, अरुण आणि राजश्रीने पटकन रोप फिक्स केला आणि सगळे जण एक एक करत सुखरूप दुसऱ्या काठावर पोहोचलो. तिथून पुढे पेठवाडी आणि आंबिवली पर्यंतचा रस्ता सोपा होता. आंबिवली मार्गे कर्जतला पोहोचल्यावर एक सुखद धक्का बसला, एवढ्या पावसात मध्य रेल्वे अगदी वक्तशीरपणा दाखवत होती.
सप्टेंबरच्या अखेरीस पावसामुळे आम्हाला ट्रेकचा मार्ग बदलावा लागेल असे चुकूनही मनात आले नव्हते. पण निसर्गाच्या रौद्ररूपापुढे मनुष्य प्राणी किती क्षुल्लक आहे याची प्रचिती घेत संध्याकाळी घरी परतलो….
महेश केंदूरकर
महेश केंदूरकर
Recent Posts
Chakram Hikers0 Comments
चक्रम
Chakram Hikers0 Comments
दसरा पूजा @ चक्रम हायकर्स, मुलुंड ऑफिस
Chakram Hikers0 Comments
पेठ-काऊल्याची-धार-नाखिंदा-भोगदा-पढरवाडी-नाखिंदा घाट-आंबिवली
Tags
ambivali trek
bhimashankar trek
bhivgad fort trek
dasra puja 2025
dhak fort trek
fort sarasgad
fort surgad
galdevi ghat
ganichi vaat
kaulyachi dhar
kothaligad trek
kurvande trek
nakhinda ghat
panhalgad to vishalgad trek
panhalgad trek
pavankhid trek
savardand
surgad to sarasgad trek
takmak trek
umbarkhind trek