भैरीचा डोंगर

पळसदरी गावाला लागूनच आहे डोंगर भैरीचा
योग मात्र कधी आला नव्हता तिथे जायचा
खरं तर असा डोंगर आहे हेच माहीत नव्हतं
पण राजश्रीचं अशाच जागांकडे लक्ष असतं

तिने भैरी डोंगराचा सोपा मार्ग शोधून काढला
चक्रमचा तिथे मग सर्क्युलर ट्रेक ठरला
तशी भैरी डोंगराची उंची काही फार नाही
हजार-बाराशे फुटाच्या वर त्या डोंगराचा चढ नाही

भाद्रपद पौर्णिमेला ट्रेकला जायचं ठरले
बघता बघता पंचवीस सवंगडी जमले
कुणी अनुभवी होते तर कुणी नवखे
उत्साहाच्या बाबतीत मात्र सर्व सारखे

आसमंत हिरवागार होता, सभोवती जंगल दाट
हत्तीसुद्धा लपेल असे गवत वाढलेले अफाट
भांगाची रेष वाटावी अशी त्यातून जाणारी वाट
रंगांची अशी उधळण जणू रांगोळीचा थाट

डोंगर उतारावर हिरवी शेतं डोलणारी
पहाऱ्यावर तिथे कितीतरी बुजगावणी
कुठे खळखळ वाहणारे झरे तर कुठे करवंदाची जाळी
कुठे उंचच उंच वृक्ष तर कधी पायाखाली वेली

भादव्याची फुले सभोवती डोलत असलेली
सोनकी, तेरडा, गौराई रानभर फुललेली
खड्या चढानंतर जात होती पठारावरून वाट
वाऱ्याची झुळूक तिथे होती मनाला सुखावत

त्या डोंगरावरील भैरीचे स्थान मात्र होते झकास
विस्तीर्ण माळावर बसला होता एका टोकास
एक प्रचंड शिळा तिथे जणू अलगद थांबली
अमूर्त त्या शिळेतच जनांना भैरीची मूर्त दिसली

शेवट झाला जेव्हा त्या पाच-सहा तासाच्या भटकंतीचा
पुन्हा पुन्हा येण्याचे आमंत्रण देत होता डोंगर भैरीचा

महेश भालेराव
२७.०९.२०२६