तीर्थ क्षेत्र महाबळेश्वर

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजश्री कामथने महाबळेश्वर परिसरात एक ट्रेक ठरवला होता. तेव्हा कनॉट पीक (Connaught Peak) या महाबळेश्वर मधील सर्वात उंच जागी जाणे झालं. तिथे एका खडकावर उभं राहून आजूबाजूला नजर टाकली तेव्हा महाबळेश्वर पठाराचा प्रचंड आवाका लक्षात आला आणि त्याहूनही जास्त जाणवलं ते पठारावरील घनदाट जंगल … इतकं घनदाट की पठारावर जणू एक हिरवी शाल पांघरलेली आहे असंच वाटत होतं. हे दृश्य जरा वेगळंच होतं..
तसा मी याआधी चार -पाच वेळा तरी महाबळेश्वरला येऊन गेलो होतो. अरुंद रस्ते, ट्राफिक जाम, सगळीकडे माणसंच माणसं, पर्यटकांनी केलेला कचरा यामुळे पुन्हा महाबळेश्वरला पुन्हा जाणं नकोसं वाटायचं. कनॉट पीक वर गप्पा मारता मारता आमच्या वाटाड्याने सांगितले की महाबळेश्वर पठारावरील विविध ठिकाणं जोडणाऱ्या पायवाटा अशाच दाट जंगलातून जातात. पण हल्ली त्या फारशा वापरात नाहीत. महाबळेश्वर पठाराच्या चहु अंगाला वसलेल्या अनेक गावातूनही वर यायला वाटा आहेत. पण सगळीकडे डांबरी रस्ते झाल्याने दाट जंगलातून वर येणाऱ्या या वाटाही आता फारशा वापरात नाहीत. हे सर्व ऐकल्यावर या भागात ऑफ बीट ट्रेक करण्यासाठी पुन्हा यायचं असं राजश्रीने ठरवलं. परत आल्यावर वाटाड्याशी फोनवर बोलून (खरं तर त्याला भंडावून सोडत) दोन-तीन दिवसात कोणत्या वाटा करता येतील याची माहिती तिने काढली आणि २८/२९ मार्चला ‘चक्रम’चा सर्क्युलर ट्रेक ठरला. ट्रेकचा मार्ग असा होता-

दिवस १:-
क्षेत्र महाबळेश्वर- गायदरा- गोळेगाव- जुगलीची वाट- डचेस रोड- कनॉट पीक (Connaught Peak)- महादेवाची पानसळ- क्षेत्र महाबळेश्वर.

दिवस २:-
क्षेत्र महाबळेश्वर- ब्रह्माची गुहा- ऋषींची पानसळ – आर्थर सीट- क्षेत्र महाबळेश्वर

पहिल्या दिवशी चाल जरा जास्त आणि चढ उताराची होती. दुसऱ्या दिवशी बहुतांश चाल सपाटीची पण जंगलातून जाणारी होती. राजश्री कामथ नेता, मी आणि शारंग उपनेता असे नेतेही ठरले. बघता बघता ट्रेकला १४ जण जमले. पण सगळेच मुंबईहून निघणारे आणि परत येणारे नव्हते. म्हणून मग tempo traveller ऐवजी आपापल्या गाड्याच घेऊन जायचं ठरवलं. तीन मुंबईहून आणि एक पुण्याहून अशा गाड्या ठरल्या …
ट्रेक तर ठरला… पण एक दिवस दुसऱ्या एका स्थानिकाने राजश्रीला माहिती दिली की गायदरा आता सोपा राहिला नाही. गेल्या दोन-तीन वर्षात तिथे डोंगर कोसळून वाट काही ठिकाणी बंद झाली आहे आणि काही ठिकाणी कठीणही झाली आहे. मग पुन्हा एकदा वाटाड्याशी फोनवर बोलणे झाले. त्याने सांगितलं की कडे कोसळल्याने वाट थोडीशी बुजली आहे हे खरं. पण तिथून जाता येण्यासारखे आहे. थोडे विचारात पडलो. पण वाटाड्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ठरलेल्या मार्गानेच ट्रेक करायचा ठरवलं…
२८ मार्चला म्हणजे शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास क्षेत्र महाबळेश्वरला पोचलो. थोडी झोप काढली आणि साडेसात वाजता गायदरा उतरत ट्रेकला सुरवात केली… त्या नंतरचा दोन दिवसांचा ट्रेक म्हणजे निव्वळ धमाल होती. सगळं काही अगदी मनासारखं झालं, ठरवल्याप्रमाणे झालं… जेवणखाण- राहणं – भटकणं सगळंच… त्यात टवाळ सोबत्यांनी ट्रेकला अजूनच मजा आणली. त्या ट्रेकची ही क्षणचित्रे :

– एकूण चाल ३० कि. मी., चढ उतार ३००० फूट
– एका वाक्यात वर्णन करायचं तर हा ट्रेक म्हणजे १५ तास भटकणं – १५ तास विश्रांती घेणं आणि १५ तास गाडी चालवणं होतं.
– गाडी चालवताना १५ तास गाणी ऐकणंही झालं
– जाता येता एकूण ४५० कि.मी. प्रवास केला. पण कुठेही ट्रॅफिक लागलं नाही की प्रवासात कुठली अडचण आली नाही.
– पानसळ हा नविन शब्द कळला. शिशिरात झाडाची पाने गळून जातात. ग्रीष्म ऋतूत ती पाने अगदी कोरडी होतात. दाट जंगलात अशा कोरड्या पाचोळ्याचा वाटेवर थर जमतो. त्यावरून चालताना होणारा आवाज म्हणजे सळ आणि अशी वाट म्हणजे पानसळ.
– ज्या वाटेवर महादेवाचे मंदीर आहे ती महादेवाची पानसळ, ऋषींची गुहा आहे ती ऋषींची पानसळ…
– या पानसळ शब्दाची पण एक गंमतच होती. झालं असं की वाटाड्याशी बोलताना महादेवाची पानसळ हे आम्हाला ऐकू आलं ‘महादेवाचा पांचाळ’. ऐकायला थोडं विचित्र वाटलं खरं पण पांचालांचा महादेव असेल आणि कालौघात त्याचं महादेवाचा पांचाळ झालं असेल अशी मनाची समजूत घातली. पण ट्रेक मध्ये वाटाड्याशी बोलताना खरं काय त्याचा उलगडा झाला आणि हसू आलं.
– गायदरा उतरताना खरोखरंच डोंगर कडा कोसळलेला दिसला. पण काही ठिकाणी थोडी अवघड झालेली वाट सोडता फार अडचण झाली नाही.
– आम्ही गायदरा उतरून गोळेगावात आल्यावर तिथे एक गावकरी भेटला. आम्ही गायदरा उतरून आलो यावर त्याचा आधी विश्वासच बसला नाही. त्याने चार -चार वेळा उतरण्याचा मार्ग विचारून खात्री करून घेतली.
– ट्रेकला निघताना उकाड्याची भीती वाटत होती. पण सातारा परिसरात ट्रेकपूर्वी पाऊस झाल्याने हवेत बऱ्यापैकी गारवा आला होता. पहिल्या दिवशी संध्याकाळी तर अक्षरश: हुडहुडी भरली होती.
– जुगलीच्या वाटेचा ( याचा अर्थ आणि व्युत्पत्ती मात्र शेवटपर्यंत कळली नाही ) चढ मात्र चांगलाच खडा होता आणि वाटेत फार झाडोराही नव्हता. पण अधून-मधून येणारी वाऱ्याची झुळूक तरतरी आणत होती.
– जुगलीची वाट चढून गेल्यावर लगेचच दाट झाडी सुरु होते. तिथेच एक बारमाही पाण्याचा झराही आहे. एका छोट्या आणि चौरस दगडी टाक्यातून हे पाणी झिरपत असतं. पाणी अगदी फ्रिजसारखं थंड होतं. खालील गोळेगावात हेच पाणी पाईपने नेलं होतं .
– मग काय? तिथेच दुपारचं जेवण ते पाणी पिऊन घेतलं आणि थोडं अंगावर देखील शिंपडून घेतलं. सगळा शीण निघून गेला.
– महाबळेश्वर पठारावरचं जंगल हे उंच-उंच वृक्षांचं नाही. जांभूळ, हिरडा, करवंद, अंबुळकी, गेळा अशी झाडं तुलनेने बुटकी झाडं आहेत. पण ती इतकी दाटीवाटीने वाढलेली आहेत की दिवसासुद्धा त्या जंगलात सूर्यप्रकाश जेमतेम पोचतो.
– वेली तर इतक्या दाट आहेत की एकवेळ टनभर दोऱ्याचा गुंता सोडवता येईल पण या जाळीतून कणभर मार्ग काढता येणं कठीण आहे.
– महाबळेश्वर पठारावरील भटकंती करताना डांबरी रस्ता लागलाच नाही असं नाही. पण डांबरी रस्ता सोडून शंभर फूट जरी जंगलात शिरलं तरी इतकं वेगळं वाटायचं की आपण एका अतिशय लोकप्रिय आणि गजबजलेल्या गिरिस्थानाच्या परिसरात आहोत यावर विश्वासच बसायचा नाही.
– त्या जंगलात ब्रिटिशकालीन घोडागाडीचे रस्ते देखील होते. पण वापरात नसल्याने ते ही पानांखाली लपले होते. हळूहळू ते ही हरवत चालले आहेत.
– नुकताच पाऊस पडल्याने वातावरण खूपच स्वच्छ होते. रायरेश्वर, कोळेश्वर ही पठारं… राजगड, तोरणा, रायगड, बिरवाडीचा किल्ला, लिंगाणा, कोकणदिवा, मोहनगड, मधुमकरंदगड, प्रतापगड, कमळगड, चंद्रगड, महादेवाचा मुऱ्हा, मंगळगड अगदी सहजच ओळखता आले… मोहनगडाच्या आजूबाजूने उतरणाऱ्या चिकना, चोरकणा, देवदांड, धाकटी भांबळ, अस्वल खिंड या घाट वाटांची जागा सहजच कळत होती.
– कृष्णाई, पंचगंगा, अतिबळेश्वर- महाबळेश्वर अशी अतिशय प्राचीन मंदिरे जिथे आहेत, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या जीवनदायी नद्यांचा उगम जिथे होतो ते खरं तर तीर्थक्षेत्र महाबळेश्वरच आहे.
– याच महाबळेश्वरच्या जावळी खोऱ्यात शिवरायांनी स्वराज्याचा घास घेण्यास आलेल्या अफझल खानाला कायमचे गाडले आहे. त्या अर्थानेही हे एक तीर्थक्षेत्र आहे.
– क्षेत्र महाबळेश्वर या नावाला एक अधिष्ठान आहे, आपलेपणा आहे. मग आपण ‘जुनं महाबळेश्वर’ असं नकारात्मकतेकडे झुकलेलं नांव का वापरायचं? इंग्रजीत तर ‘Old Mahabaleshwar’ असंच नांव रूढ झालं आहे. वास्तविक शेकडो वर्षाचा इतिहास असलेल्या महाबळेश्वराची तीर्थक्षेत्र हीच पहिली ओळख आहे, असायला हवी.
– क्षेत्र महाबळेश्वर ते आर्थर सीट या मार्गावर असलेली ब्रम्हाची गुहा आवर्जून पाहण्यासारखी आहे. तिथूनच थोडं पुढे एक अगदी छोटेसे एकाश्म मंदीर आहे. ते खरोखरच एका दगडातून कोरल्यासारखे वाटते.
– आर्थर सिटच्या खालच्या बाजूला असलेल्या विंडो पॉईंट वरून बहिरीची घुमटी, चंद्रगड, मंगळगड, महादेवाचा मुऱ्हा बघताना सह्यांकन १९९१च्या आठवणी जाग्या झाल्या. तो माझा चक्रम बरोबरचा पहिलाच ट्रेक होता. तेव्हापासून सुरु झालेली डोंगरयात्रा अजूनही सुरूच आहे…
– महाबळेश्वर पठार एवढं प्रचंड आहे. पण तिथून थेट कोकणात उतरण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे. तो म्हणजे आर्थर सीटवरून बहिरीची घुमटी मार्गे ढवळे गावात उतरणारा ढवळ्या घाट.
– आमचा वाटाड्या म्हणजे त्या परिसराचा ज्ञानकोष. त्याला प्रत्येक पायवाट आणि घाटवाट माहीत होती. पण वापरच कमी झाल्याने या वाटा आता हरवत चालल्या आहेत, पाचोळ्याखाली दबत चालल्या आहेत याची त्याला खंत होती. पण सह्याद्रीत सर्वत्रच हा प्रश्न उभा राहिला आहे. वाड्या पाड्यातील तरुण पिढी आता पोटापाण्याचे उद्योग शोधण्यासाठी शहरात जात आहे. पुढच्या पिढीत जर या वाटा माहीत असणारी लोकं राहिलीच नाहीत तर? हा ‘तर’ मलाही खंतावून गेला…
– आमच्यापैकी प्रत्येकजण याआधी महाबळेश्वरला येऊन गेला होता. पण त्या दोन दिवसात एक वेगळंच महाबळेश्वर बघितलं हेच सगळ्यांचं मत होतं.
– इतकं सगळं छान चाललं होतं तर मग महाबळेश्वरची खासियत असलेले strawberry cream खाल्लं नाही असं कसं होईल? एकदा नाही तर दोनदा आम्ही त्यावर ताव मारला.

रविवारी- २९ तारखेला – दुपारी साडेतीन वाजता एक सुंदर ट्रेक संपवून आम्ही परत निघालो. गाडी सुरु केली… त्या दोन दिवसाच्या धमाल मुडला साजेसे माझ्या आवडीचे हिंदी गाणं – चलत मुसाफिर मोह लिया रे – मी लावलं. शंभर दीडशे गाण्यांची ती play list होती. गप्पा गाण्याच्या नादात ठाणं कधी आलं ते कळलंच नाही… रात्रीचे साडेदहा वाजले होते. गाडी ठाण्यात शिरली आणि नेमकं तेव्हा ‘चलत मुसाफिर मोह लिया रे’ हेच गाणं पुन्हा लागलं… एक धमाल ट्रेक संपताना अनुभवलेला हा एक विलक्षण योगायोग…

महेश भालेराव
०१/०४/ २०२६

Add a Comment

Your email address will not be published.