माहुली आणि पळसदुर्ग

करायला गेलो एक….

काल खरं तर मी मुलुंडच्या टेकडीवर जायचं ठरवलं होतं. पण पहाटे साडेचार वाजताच जाग आली आणि मग झोप काही लागली नाही. तेव्हा डोक्यात किडा वळवळला… आता उठलोच आहोत तर माहुलीला जाऊन यावं का? गेले काही महिने माहुलीला जायचं डोक्यात कुठेतरी येतंच होतं… रेल्वे वेळापत्रक बघितलं. आसनगावला जाणारी लोकल पावणे सहा वाजता होती. हातात वेळ होता. जी मुलुंडच्या डोंगरावर जायची तयारी होती त्यात फक्त पाणी वाढवायचं होतं. मी माहुलीला जायचं ठरवलं आणि आसनगाव ट्रेन पकडली.
ट्रेनने वेग घेतला आणि चांगलीच थंडी जाणवू लागली. आसनगावला उतरून माहुली गावात रिक्षाने जाताना तर अक्षरश: कुडकुडायला झालं. माहुली किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच विनोद आगीवलेंचे हॉटेल आहे. तिथेच चहा-नाश्ता केला. गडाकडे निघण्यापूर्वी मी विनोदला वाटेबद्दल विचारले आणि कुणी वाटाड्या मिळेल का हेही विचारले. तेव्हा “माहुली किल्ल्यावर जाणारी वाट अगदी मळलेली आहे. कुठेही वाट चुकण्याची शक्यत नाही. तसेच वाटेत ठिकठिकाणी दिशा /स्थानदर्शक फलकही लावले आहेत.” असं विनोदने सांगितलं. दोन-तीन जणं पुढे गेले आहेत असंही त्याने सांगितलं. मी गडाकडे निघालो तेव्हा आठ वाजून गेले होते. दोन-अडीच तासात माथ्यावर पोचून लगेच खाली उतरायचं आणि दोन वाजेपर्यंत घरी पोचायचं असं काहीतरी माझ्या डोक्यात होतं.
तसा मी माहुली किल्ल्यावर याआधी दोनदा जाऊन आलो होतो. पण त्यालाही आता २५ वर्ष तर सहजच होऊन गेली होती. त्या दोन्ही वेळा पावसाळ्यातच गेलो होतो. धो-धो पाऊस, माहुली किल्ला पार ढगात हरवलेला, आजूबाजूचा परिसरच काय बाजूला उभा असलेला माणूस सुद्धा दिसणं मुश्कील इतका माहुली तेव्हा ढगात हरवलेला होता. आता इतक्या वर्षानी गडाचा महादरवाजा सोडून बाकी काहीही बघितल्याचं आठवत नव्हतं. माहुली किल्ल्याला लागूनच पळसदुर्ग आणि भंडारगड आहेत हे नंतर कितीतरी वर्षांनी कळलं होतं.
हवेत चांगलाच गारवा असल्याने माहुली चढताना उन्हाचा त्रास असा जाणवत नव्हता. अर्धा गड चढून गेल्यावर पंचवीशीतला एक तरुण भेटला. पाठीवर मोठी सॅक घेऊन तो गडावर चालला होता. आम्ही दोघेही एकेकटे असल्याने बरोबरच चालू लागलो. सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आम्ही गडावर पोचलो. तिथून महादरवाजात असलेल्या पाण्याच्या टाक्यापाशी जाऊन आम्ही विश्रांतीला थांबलो.
विरारला राहणाऱ्या त्या तरुणाचे नांव होते हार्दीक साने. मी त्याची सॅक सहज उचलून पाहिली. किमान १५ किलोची तर सहजच होती. मला वाटले की हार्दीकचा गडावर मुक्काम करून काही climbing वगैरे करायचा विचार असावा आणि बाकीची टीम मागून येत असावी. मी तसे त्याला सहज विचारले देखील. तेव्हा तो म्हणाला की एवरेस्ट शिखर चढायची त्याची इच्छा आहे आणि म्हणून तो लोड फेरी करायला माहुलीला आला होता. त्या एका दिवसात तो तीन वेळा माहुली चढणार होता आणि दोनदा उतरणार होता. त्याचे बेसिक आणि advance असे दोन्ही कोर्स झाले होते. त्याने तीन वर्षांपूर्वी सुद्धा एवरेस्ट चढायचे स्वप्न पाहिले होते पण काही अडचणीमुळे ते शक्य झाले नव्हते.
माहुलीला येण्यासाठी हार्दीक पहाटे साडेतीन वाजता घरातून निघाला होता. मी त्याला लोड फेरीसाठी विरार जवळच्याच किल्ल्यावर का नाही गेला हे विचारलं तेव्हा तो म्हणाला माहुली एवढी निव्वळ उंची आणि चढाईतला खडेपणा दुसरीकडे मिळतं नाही आणि म्हणून माहुली त्याचा आवडता किल्ला होता. त्याचं बोलणं पटण्यासारखं होतं. माहुलीचा निव्वळ चढ अडीच हजार फूट आहे. म्हणजे एका दिवसात हार्दीक साडेसात हजार फूट चढणार होता आणि पाच हजार फूट उतरणार होता. पुढे असंही कळलं की माहुलीला तो किमान १५ वेळा तरी येऊन गेला होता. त्याचे १९२ किल्ले आणि तीन-चारशे trek सहज झाले होते. हे सर्व ऐकून मला खरोखरच हार्दीकचे कौतुक वाटू लागले.
महादरवाजाला भोज्या करून माझा परत जायचा विचार होता. आता परतीला मला सोबतीही होता. पण हार्दीक इतक्या वेळा माहुलीला आला होता. तेव्हा सहज माहिती घ्यावी म्हणून मी त्याला पळसदुर्ग आणि भंडारगडावर जायच्या वाटेबद्दल विचारलं. तेव्हा हार्दीकने सांगितले की दोन्ही गडावर जायला आता चांगली मळलेली वाट आहे आणि अजिबात चुकायला होत नाही.
ते ऐकल्यावर माझा महादरवाजातून परत जायचा विचार थोडा डळमळीत झाला. विचार करता करता ‘ आलोच आहोत तर दोन्ही किल्ले करावेत ‘ असं वाटू लागलं… एकूण चार तास दोन्ही किल्ल्यांच्या फेरीला सहज लागणार होते.

शेवटी दोन्ही किल्ले करायचं ठरवलं… हार्दीक परत जायला निघाला. कदाचित तो पुढच्या फेरीत मला भेटलाही असता. पण न भेटल्यास रुखरुख लागायला नको म्हणून त्याला एवरेस्टसाठी शुभेच्छा दिल्या… त्या दोन तासांच्या ओळखीत इतके कष्ट करणारा हार्दीक निश्चितच एवरेस्ट गाठण्याच्या योग्यतेचा वाटला. हार्दीक पुन्हा माहुली गावाकडे आणि मी पळसदुर्गाकडे निघालो. वाट खरोखरच मळलेली होती, दाट जंगलातून जात होती. आधी वेगवेगळी झाडं आणि मग बांबूचे वन लागले. सुमारे ३०० फूट उतरल्यावर आपण पळसदुर्ग आणि माहुली किल्ल्याच्या खिंडीत पोचतो. तिथे वरच गणेश दरवाजा आहे. पण पुढचा मार्ग थोडा अवघड वाटला आणि परत जाऊन भंडारगड पण पाहायचा होता. म्हणून मी त्या दरवाजातूनच परत निघालो आणि बारा वाजता पुन्हा माहुली किल्ल्याच्या महादरवाजात आलो.
तिथून थोडे परतीच्या मार्गावर आल्यावर एक पायवाट भंडारदुर्गाकडे जाते. त्या वाटेने पुढे निघालो. केसातल्या भांगासारखी वाटणारी ती पायवाट सपाटीवरून पुढे पुढे जात होती. अधून मधून थोडी कड्याच्या दिशेने जात होती तेव्हा सभोवतालचे दिसणारे दृश्य मात्र अप्रतिम होते.

अर्ध्या पाऊण तासाने अचानक एका चिंचोळ्या खिंडीशी आलो. ती खिंड चांगलीच अंगावर आल्यासारखी वाटत होती. समोरच्या बाजूला एक दोन टप्प्यात विभागलेली शिडी आणि वरती काही पायऱ्या दिसत होत्या. पुढे जावं की न जावं हा विचार करत होतो. तेव्हा शिडीपर्यंत जावं आणि जास्त कठीण वाटलं तर परत यावं असा विचार करून मी शिडी गाठली. सुदैवाने लांबून वाटलं तितकं काहीच कठीण नव्हतं. मी आता भंडारदुर्गावर पोचलो होतो. पंधरा-वीस मिनिटे पुढे गेल्यावर ‘कल्याण दरवाजाकडे’ असा फलक दिसला. तिथे थोडं खाली उतरल्यावर दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्याही लागल्या. पण त्या पायऱ्या पुढे तुटल्या होत्या. म्हणून मग अजून पुढे जायचा विचार रद्द केला आणि पुन्हा पायवाटेला लागलो.
आता वाट जवळपास माळरानावरून जात होती. कल्याण दरवाजाच्या जवळच एका ठिकाणी मला गुहा दिसल्यासारखं वाटलं. म्हणून जवळ जाऊन पाहिलं तर ते एक बऱ्यापैकी मोठं टाकं होतं. त्यात दोन रुंद खांबही होते. जेमतेम तीन फूट उंचीचे ते खांब टाकं अगदी जवळ येईपर्यंत काही दिसत नाही.
टाक्यापासून पुढे निघाल्यावर थोड्याच वेळात आपण भंडारदुर्गाच्या टोकाशी येतो. तिथून दिसणारे दृश्य मात्र खिळवून टाकणारे होते. प्रस्तरारोहकांची पंढरी मानले जाणारे माहुलीचे सुळके अगदी समोर दिसत होते. आपल्या प्रचंड आकारासाठी नावाजलेला भटोबा, नवरी, नवरीची करवली एकमेकांना अगदी खेटून उभे दिसले. एका टोकाला वजीर दिसत होता… ध्यानी – मनी नसताना ते दृश्य समोर आले… जमेल तसे फोटो, व्हिडीओ काढले आणि एक वाजण्याच्या सुमारास मी परत फिरलो.
शिडी उतरून माहुली किल्ल्यावर आलो… शिवदुर्ग प्रतिष्ठानने किल्ल्यावर सगळीकडे चांगले दिशादर्शक/स्थानदर्शक फलक लावले आहेत. त्यामुळे गडावरील तळं, माहुलेश्वराचे देवालय, सभामंडप, वाडा, हनुमान दरवाजा इतकं सहज बघता आलं. मी हनुमान दरवाजापर्यंत खाली काही उतरलो नाही. कारण तिथेही उतरणे अवघड वाटले. पण मळलेली वाट आणि शिवदुर्ग प्रतिष्ठानने जागोजागी लावलेले फलक यामुळे किल्ल्यावरील बहुतेक मुख्य वास्तू मात्र बघून झाल्या.
सगळं बघून मी माहुली किल्ला उतरायला सुरवात केली तेव्हा पावणे तीन वाजून गेले होते… माहुली गावात पोचलो तेव्हा सव्वाचार वाजले…

आसनगाव स्टेशन वरून परतीची ट्रेन पकडली… ट्रेन तासभर उशिरा आली पण मला सुदैवाने बसायला मिळाले…
काल सकाळी लवकर जाग येते काय… मुलुंड टेकडीवर जायच्या ऐवजी मग मी माहुलीला जातो काय… तिथे एक नविन मित्र भेटतो काय आणि मग त्याच्या सांगण्यामुळे पळसदुर्ग, भंडारगड आणि आजपर्यंत न बघितलेला माहुली किल्ला बघायला मिळतो काय…. सगळंच कसं छान जुळून आलं..
कालच्या शनिवारी खरोखरच अचानक गड लाभ झाला…

महेश भालेराव
११/०१/२०२६