घोडेपाण्याची नाळ चढाई – रिठ्याचे दार उतराई

ट्रेक तर होत असतात पण काही ट्रेक हे तुमच्या पूर्ण क्षमतेची परीक्षा बघतात असाच हा ट्रेक या बद्दल थोडंसं…

14 फेब्रुवारी काही लोकांसाठी आपले प्रेम व्यक्त करायचा दिवस पण आम्ही दर्दी ट्रेकर मंडळी सर्वात जास्त प्रेमात पडतो तो म्हणजे एक चांगला ट्रेक व अशाच एका भन्नाट ट्रेक आयोजित केला होता चक्रम हायकर्स मुलुंड यांनी तो म्हणजे,घोडेपाण्याची नाळ व रिठ्याचे दार.या ट्रेक साठी मुख्य लीडर सौ. राजश्री कामत, सह लीडर श्री. महेश भालेराव, सह लीडर श्री. अरुण कुंभार सोबत एकसे एक धुरंधर ट्रेक्कर्स ज्यांच्याकडे ट्रेकिंग चा बऱ्यापैकी अनुभव होता. त्यामुळे या ट्रेक ला मजा जास्त येणार हे तेव्हाच वाटत होते.

चक्रम ऑफिस मधुन रात्री 9.30 वाजता बस काटेवाडी,मु.सिंगापूर, ता. मुरबाड, जि.ठाणे च्या दिशेने निघाली, वाटेत एक छोटासा चहा ब्रेक घेवून बरोबर 12.30 वाजता गावात पोहोचलो, गाव झोपेत होता,या ट्रेकचे गाईड हरिभाऊ आमची वाट बघत होते, आमच्यातील दोन महिला ट्रेकर्सची राहण्याची सोय त्यांच्याकडे करण्यात आली व आम्ही एका समाज मंदिरात झोपायला गेलो.रात्रीचे वातावरण थंड होते, आत्ता चार तास झोप मिळणार होती, सकाळी 4.30 वाजता ट्रेक लीडर नी सर्वांना आवाज देऊन उठवले,थोडी झोप मिळाल्यामुळे फ्रेश वाटत होते व सर्व जण चहा नाष्टा करून ट्रेक सुरु करण्यास पूर्ण पणे सज्ज झाले. आज महाशिवरात्री असल्यामुळे मी उपवास धरला होता व सोबत आणलेली साबुदाणा खिचडी खाल्ली,या ट्रेक बाबत सर्वांच्या मनात कुतूहल होते कारण या नाळे ला घोडे पाण्याची नाळ असे का म्हणतं असतील तर सर्वांनी असा अंदाज लावला की या नाळेचे नाव गोडे पाण्याची नाळ असेल व पुढे जाऊन त्याचा अपभ्रंश घोडेपाण्याची झाला असेल. तर येताना रिठ्याचे दार या मार्गाने यायचे होते, जिथे रस्त्यात अनेक रिठ्याची झाडे आहेत. अशी चर्चा व सर्वांची तोंडओळख व ट्रेक बद्दल माहिती देऊन ट्रेक लीडर च्या आदेशाने हा ट्रेक सुरु झाला. सकाळचे 6.30 वाजले होते, अजून सूर्योदय व्हायचा होता त्यामुळे टॉर्चच्या प्रकाशात ट्रेक सुरु केला. सिंगापूर येथील कोळेवाडी येथून ट्रेक ला सुरुवात झाली,मळलेल्या पायावाटेने चालत आम्ही साधारण एक तासा नंतर नाळेच्या तोंडापाशी येऊन पोहोचलो, वाटेत काही कोरडे ओढे लागले त्यातून वाट काढत आत्ता मुख्य चढाई ला सुरुवात झाली. हरिभाऊ नी समोर दिसणाऱ्या डोंगर रांगेतून जाणारी नाळ,जायचा व यायचा मार्ग दाखवला. डावीकडे जिवधन किल्ला व उजवीकडे ढाकोबा व मध्ये घोडपाण्याची नाळ असा नजारा दिसत होता. डोंगरा मागून सूर्योदय होत होता त्यामुळे टॉर्च बॅग मध्ये ठेवून नाळ चढायला सुरुवात झाली.पावसाळ्यातील पाणी काही ठिकाणी अजूनही साठून राहिले होते. अश्याच एका ठिकाणी हरिभाऊ नी कोणाला पाणी हवं असेल तर भरून घ्या म्हणून सांगितले, या साचलेल्या पाण्यात काही छोटे मासे मनसोक्त पणे पोहत होते जणू काही आम्हाला सांगत होते, बिनधास्त पाणी प्या आम्ही ते स्वच्छ ठेवले आहे. येथेच बसून सोबत आणलेला खावू खाऊन पुढे निघालो.जशी नाळ पुढे चढू लागलो तशी चढणे खूपच कस बघणारी होती, प्रत्येक पाऊल बघून टाकत होतो,काही ठिकाणी टोचणारी कारवीच्या सुकलेल्या काटक्या पाया मध्ये येत होत्या तर काही ढासळलेले छोटे दगड पाया खालून तर कधी हात ठेवल्यावर खाली येत होते. दोन्ही बाजूने प्रचंड कातळ कडा तर काही त्यात तयार झालेली मधमाश्याची पोळी व आजूबाजूने गुणगुणणाऱ्या मधमाश्या. थोडा वेळ शांततेत तो मार्ग सर्वांनी पार केला व निश्वास सोडला. आत्ता सकाळचे 10.30 वाजले होते पाऊल दमली होती त्यामुळे सर्वांनाच तरतरी आणणाऱ्या कोकम सरबताची गरज होती, श्री महेश भालेराव यांनी सोबत नेहमी प्रमाणे थंडगार पाणी व कोकम सरबत आणलं होत,जसे आम्ही पुढे जातं होतो, तसे बाहुला बाहुली डोंगर, जिवधन सुळका आमच्या मागे तर नाळेच शेपूट म्हणजे शेवटचा भाग दिसायला लागला होता अजून एक तास चढाई बाकी होती. आम्ही आत्ता या ट्रेक मधील सर्वात फेमस स्पॉट वर येऊन पोहोचलो, येथून अनेक ट्रेकर नी फोटो काढले आहेत, आम्ही पण छान फोटोग्राफी केली व पुढे निघालो. नाळेच्या शेवटच्या टप्यावर जाणारी वाट, एकदम निसरडी होती, बारीक दगड व माती या मुळे पाय सरकत होते, या तून मार्ग काढत 12 वाजता आम्ही घोडेपाण्याची नाळ चढलो. तीव्र चढाई नंतर थंडगार लिंबू सरबत व नंतर दुपारचे जेवण करूया असे ठरले, मी मात्र बटाटा चिवडा, फळ असा आहार घेऊन थोडा आराम केला. 1 वाजता पुन्हा रिठ्याचे दार उतरायला सुरुवात केली. चढाई पेक्षा उतराई जास्त लक्ष पूर्वक करावी लागते. छोटीशी तीव्र उताराची पायावाट बाजूने पुन्हा कारवी ची झाडी, तर काही ठिकाणी पाया खालून सरकणारे दगड, कधी डावीकडे तर कधी उजवीकडे, काही वेळेला दगडावर बसून तर कधी त्यावरून घसरत रिठ्याचे दार उतरणे सुरु होते,लांबवर काटेवाडी दिसत होते, हरिभाऊ पुढे व लीडर सोबत बाकी मंडळी उतरताना अतिशय काळजीपूर्वक उतरत होती कारण उतरताना गुडघ्यावर चांगलाच जोर येतो व उतरताना पार घसरू नये याची सर्वजण काळजी घेत होते.एकमेकांसोबत रिठ्याचे दार ही वाट उतरत होते.उतरताना नाणेघाट, नाण्याचा अंगठा, जिवधन गड असा सुंदर नजारा मनात भरत होता.दुपारचे 3.30 वाजले होते मग एक कोकम सरबत ब्रेक घेतला, आत्ता बरीचशी नाळ आम्ही उतरलो होतो व पुढे ही नाळ जेथून हा ट्रेक सुरु केला त्या कोळेवाडी मध्ये जाऊन मिळते.शेवटचा टप्पा पार करताना वाडी कधी येईल असं झालं होत,सकाळी 6.30 वाजता सुरु केलेला ट्रेक संध्याकाळी 5 वाजता संपला व आम्ही परत काटेवाडी गावात हरिभाऊंकडे आलो. छान फ्रेश होऊन परतीच्या मार्गाला लागलो.या ट्रेक ला असलेली मित्र मंडळी माझ्या वयोगटातील होती, खऱ्या अर्थाने ट्रेकर्स चा कस बघणारा ट्रेक पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. या सर्वासोबत एक वेगळीच मजा आली.व 14/15 फेब्रुवारी 2026 नेहमी स्मरणात राहील हे नक्की.

मकरंद सदावर्ते

Add a Comment

Your email address will not be published.