सोनगड (सोनवडे) भैरवगड (नरवडे) आणि सिद्धगड (ओवळीये) किल्ले

एक, दोन, तीन …

कणकवली जवळच्या वागदे गावातील आर्यादुर्गा मंदिरात आणि जांभवडे येथील भगवती मंदिरात ३ जानेवारीला काही घरगुती धार्मिक कार्यक्रम ठरला होता. त्यासाठी मी ३१ डिसेंबरलाच कणकवलीत पोचलो होतो. घरचे बाकी सगळे लोकं २ तारखेला सकाळी येणार होते. त्यामुळे १ जानेवारीचा दिवस हातात होता. काय करावं याचा विचार करत होतो.
मागे कधीतरी कणकवली परिसरातील किल्ल्यांची यादी वाचण्यात आली होती. त्यातले सोनगड (सोनवडे), भैरवगड(नरवडे) आणि सिद्धगड(ओवळीये) हे किल्ले आवाक्यात वाटत होते, चढाईसाठी तसे सोपे किल्ले होते. ओवळीयाच्या सिद्धगडाच्या तर अगदी पठारापर्यंत गाडी जाते. त्यामुळे हा किल्ला बघायला एक तासही खूप होणार होता. तेव्हा हे तिन्ही किल्ले १ जानेवारीला करायचं ठरवलं.
सोनगडाजवळच्या घोटगे गावातील सचिन तेली यांची तशी ओळख होती. म्हणून मग ३१ डिसेंबरला रात्री घोटग्यातच रहायला गेलो. त्यांनीच मला घोटग्यातील संजय वंजारेंची रिक्षा मिळवून दिली. १ तारखेला सकाळी सातच्या सुमारास निघायचे ठरले. पण ३१ डिसेंबरचा परिणाम म्हणा किंवा एकंदरीतच वेळेच्या बाबतीत असलेली उदासीनता म्हणा संजय उशिरा आला आणि मला घोटगे गावातून निघायलाच नऊ वाजले.
घोटगे गावातून सोनवडे गावात जाताना एक छोटासा घाट लागतो. त्या घाटातून एक वाट सोनगडाकडे जाते. किल्ल्यावर जायला ही सर्वात सोपी वाट आहे. संजयने दहा मिनिटातच मला या वाटेवर सोडले आणि तो घोटग्यात परत गेला.

सोनगड किल्ला तसा तीन-चार टप्प्यात उलगडत जातो. माथा आला असं वाटत राहतं आणि मग पुढचा टप्पा दिसतो. पण सोनगडाची चढाई कुठेही अवघड नाही. दोन ठिकाणी निमुळत्या सोंडेवरून जाणारी पायवाटही खूप छान वाटते. वाटेत सोनगडाचा मार्ग दाखवणारे फलक सुद्धा लावले आहेत. शेवटच्या टप्प्यात आपण एक आडवा traverse मारून एका ध्वजस्तंभाजवळ पोचतो. चालताना मला काही ठिकाणी भग्नावशेष आणि थोडीफार तटबंदी देखील दिसली. सोनगडावर ध्वजस्तंभाच्या पुढेही जाणारी वाट दिसत होती. गडावर नेढं आहे, भग्नावस्थेतील देऊळ आहे, इतरही काही अवशेष आहेत असं वाचलं होतं. पण सकाळी निघायला आधीच दोन तास उशीर झाला होता. त्यामुळे सोनगडावर फार काही न बघता साडेदहा वाजता मी ध्वजस्तंभाजवळून परत फिरायचं ठरवलं. संजयला फोन केला… पावणेबारा वाजता जिथून चालायला सुरवात केली तिथे खाली पोचलो आणि रिक्षाने भैरवगडाकडे निघालो.
आदल्या दिवशी घोटगे गावात गप्पा मारताना कुणीतरी मला सांगितलं होतं की नरडवे गावापेक्षा दिगवळ्याच्या रांजणवाडी गावातून चढाई सोपी आहे. पण संजयचे ठाम म्हणणे पडले की वाट मळलेली असल्याने नरडवे गावातूनच चढाई करणे जास्त सोयीचे आहे. त्याचा ठामपणा बघून मी नरडवे गावातूनच भैरवगड चढायचं ठरवलं. गडाच्या पायथ्याशी पोचलो तेव्हा बारा वाजून गेले होते.
पायथ्याशीच बाईत कुटुंबाचे घर आहे. वाटेची थोडी माहिती घ्यावी म्हणून त्या घरात डोकावलो. तिथे एक मावशी भाताची झोडपणी करत होत्या. त्यांना गडाची वाट विचारून घेतली. त्याही म्हणाल्या की वाट अगदी मळलेली आहे. सुरवातीची वाट जंगलातून आहे पण शेवटचा टप्पा खडा आणि निमुळत्या धारेवरून जातो आणि तिथे सावली नाही. त्यांच्या अंदाजाप्रमाणे गडावर जाऊन यायला अडीच तास पुरेसे होते. आता गडावर जायला निघणारच होतो इतक्यात माझ्या डोक्यात विचार आला की त्या मावशीनाच दुपारच्या जेवणाविषयी विचारावं का. संजयकरवी अस्सल मालवणी भाषेत मी मावशींना जेवणाचे विचारले. सुदैवाने त्या मावशीही जेवण देण्यास तयार झाल्या.
साडेबारा वाजता मी भैरवगडावर जायला निघालो. हवेत सकाळीसुद्धा फारसा गारवा नव्हता. त्यात आता तर भर दुपार आणि तीही कोकणातली. त्यामुळे चांगलंच उकडत होतं. सुरवातीचा अर्धा तास वाट दाट जंगलातून होती तेव्हा थोडसं बरं वाटलं. पण त्यानंतर खडा चढ सुरू झाल्यावर मात्र अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. भैरवगडाचा शेवटचा साधारण हजार फूट चढ हा अगदी खडा, कुठेही सावली नसलेला आणि निमुळत्या सोंडेवरून जाणारा आहे. अर्थात चढ खडा असला तरी वाट कुठेही धोकादायक नाही किंवा चुकण्याची शक्यता नाही. भैरवनाथाच्या देवळाच्या थोडं आधी अगदी चढ्या पायऱ्या लागतात. त्या पायऱ्यांना लोखंडी कठडे लावले आहेत.
कडक ऊन आणि खडा चढ यामुळे सतत पाणी प्यावंसं वाटत होतं. यामुळे माझी चालही चांगलीच मंदावली होती. चालता-चालता काही ठिकाणी लांब आणि मजबूत बांबूना मधोमध पोत्यात गुंडाळून बांधलेले जांभ्या दगडाचे चिरे दिसले. एकेक चिरा ५० किलोचा तरी असेल. ते चिरे तिथे आहेत, वाट मळलेली आहे म्हणजे आजूबाजूला कुणी असेल असं मला वाटलं पण वाटेत कुठे चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हते. ही माणसं गेली कुठे हा प्रश्न डोक्यात आला. मी आता अंतिम टप्प्यात म्हणजे पायऱ्यांपाशी आलो होतो. तिथून देऊळ चालत फारतर दहा मिनिटं होतं ( ही माहिती मला गडाखालीच मिळाली होती.). दीड तासाची सलग चढाई झाली होती.
त्या पायऱ्यांशी मात्र मला एक गावकरी वर जाताना दिसला. अंगातला शर्ट काढून खांद्यावर टाकून चालणाऱ्या त्या गावकऱ्याकडे बघून क्षणभर मलाही तसंच करावंसं वाटलं. पण क्षणभरच…. त्याच्या मागोमाग चालत मी गडमाथ्यावरच्या भैरवनाथाच्या देवळाशी पोचलो.

उकाड्याने हैराण झालेल्या मला त्या देवळाच्या सावलीत पाठ टेकल्यावर जणू स्वर्गसुखाचा अनुभव आला. त्यात वाऱ्याची थोडीशी झुळूकही सुटलेली होती… तो गावकरी लगोलग देवळात गेला आणि एका लोटीतून प्यायला पाणी घेऊन आला. मला कळेना त्या देवळात पाणी भरून कुणी ठेवले होते. माझ्या चेहऱ्यावरचा प्रश्न त्या गावकऱ्याने बरोबर वाचला असावा. त्याने सांगितलं की ही आमची पद्धत आहे. देवळात दोन कळशा पाणी कायम भरलेले असते. पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी श्रमदान करून भैरवनाथाच्या देवळाचा जीर्णोद्धार केला होता. त्यासाठी त्यांनी ५०-५० किलोचे दगडाचे चिरे खांद्यावरून वाहून आणले होते. एका दमात चिरा नेणं शक्य न झाल्यास चिरा मध्येच ठेवून गावकरी परत जात आणि मग दुसऱ्या दिवशी तो चिरा पुन्हा वर घेऊन येत. मला वाटेत दिसलेल्या चिऱ्यांचे कोडे सुटले होते. तो गावकरी पुढे असंही म्हणाला की चिरे वर आणताना गावकरी खूप दमतात, तहानलेले होतात. म्हणून गडावरून परत जाताना रिकामी झालेली कळशी भरून ठेवण्याची पद्धत सुरू झाली होती. म्हणजे देवळात आल्या -आल्या लोकांना पाणी प्यायला मिळतं. ती अतिशय छोटी वाटणारी गोष्ट गावकऱ्यांची एकमेकांप्रति असलेली आस्था आणि माणुसकीची जाणीव करून गेली.

पाचच मिनिटात तो गावकरी परत निघाला देखील. मी थोडीशी अजून विश्रांती घेतली आणि परत निघालो. देवळाच्या बाजूलाच दीपमाळ आहे, दोन तोफा आहेत. देवळात शंभर माणसांचे जेवण होईल इतकी भांडी-कुंडी होती. देवळाच्या मागे थोडं खाली झाडोऱ्यात लपलेलं एक पाण्याचं टाकंही इतरत्र फिरायला माझ्याकडे फार वेळ नव्हता. गडावर यायच्या तीनचार सोंडा आहेत. त्यातली एक सोनगडाकडे, एक रांजणवाडीकडे जात होती. सोनगडाकडे जाणाऱ्या सोंडेच्या शेवटी एका धरणाचे बांधकाम चालू असलेले दिसले. असं सगळं भरभर नजरेत साठवत मी सव्वा तासात गड उतरून पायथ्याशी पोचलो तेव्हा साडेतीन वाजले होते.
मावशींनी जेवण तयारच ठेवले होते. छान हातपाय धूवून जेवायला बसलो. बिनसडीच्या तांदुळाचा भात, आमटी काळ्या वाटाण्याची उसळ, तांदूळ भाकरी आणि मेथीची भाजी असा फर्मास बेत होता. मलाही चांगलीच भूक लागली होती. ते अतिशय रुचकर जेवण भरपेट जेवलो… “अन्नदाता सुखी भव” या श्लोकामागच्या भावनेचा मला त्या जेवणानंतर प्रत्यय आला…त्या मावशीना मी दंडवत घातला आणि प्रसन्न मनाने ओवळीये गावाकडे निघालो.
रिक्षा सुरू झाली आणि काही मिनिटातच मी अक्षरशः पेंगू लागलो. त्यानंतर उठलो ते थेट ” साहेब, उठा. ओवळीये गावाचा फाटा आला ” या रिक्शावाल्याच्या हाकेने… मावशीच्या रुचकर जेवणाने आपले काम चोख केलं होतं…

ओवळीये गावाच्या आधीच सिद्धगडाकडे जाणारा गाडीरस्ता आहे तो थेट गडाला लागून असलेल्या पठारापर्यंत जातो. त्यामुळे गड चढावा लागतच नाही. मी पाच वाजता पठारावर पोचलो. तिथे गडाची दिशा दाखवणारा फलक होता. तिथून चालत-चालत मी निघालो. एक तटबंदी सदृश भिंत पार करून पुढे निघालो. गडावर चांगलंच रान माजलं होतं. तसंच गडाच्या आजूबाजूलाही जंगल होतं. वनदुर्ग या दुर्ग प्रकाराला साजेसं आजूबाजूचे वातावरण होते. जेमतेम पाऊण तासात गडाची फेरी पूर्ण झाली. गडावर असेलेले सिद्धेश्वराचे देऊळ ही एकच वास्तू त्यातल्या त्यात शाबूत होती. बाकी जे काही होते ते भग्नावशेष… ते बघून मात्र थोडं खिन्न व्हायला झालं. पण ती अपरिहार्यता होती…
सिद्धगड बघून वागदे गावातील आर्यादुर्गा देवळात पोचलो तेव्हा देवळात आरतीची तयारी सुरू होती… त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन तारखेला जांभवड्याचे भगवतीचे देऊळ, सोनवड्याचे लिंगेश्वर आणि रवळनाथाचे देऊळ, वागद्याचे गांगेश्वर आणि पावणा देवीचे देऊळ, ओवळीये गावातील रामेश्वराचे देऊळ बघितले ते सर्व कुटुंबियांसोबत .
नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक दुर्गत्रयी बघून झाली… दुसऱ्या दिवशी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावांमधील सुंदरशी देवळं बघितली…
नविन वर्षाची सुरवात तर छान झाली!!!

महेश भालेराव
१२/०१/२०२६

Add a Comment

Your email address will not be published.